पाचोरा (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील एका युवकाचा मोबाईल चुकुन रस्त्यावर पडल्यानंतर तो वृत्तपत्र विक्रेत्याने प्रामाणिकपणे विनाविलंब पोलीस स्टेशनला आणून दिला. या घटनेमुळे प्रामाणिक वृत्तपत्र विक्रेत्याचे खाकीसह राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे.
भडगाव तालुक्यातील बात्सर येथील युवक देवा गायकवाड हा स्टेशन रस्त्यावर पाणीपुरीच्या गाडीवर उभा होता. त्यावेळी त्याचा अंदाजे विस हजार रुपये किमतीचा मोबाईल खिशातून नकळत खाली पडला. त्यानंतर सदर युवक तेथून सरळ स्टेट बँकेत आपल्या मित्रांसमवेत आला. दरम्यान रस्त्यावर पडलेल्या मोबाईलवर स्टेशनवर वृत्तपत्र विक्री करणारे सुरेश गायकवाड यांचा अचानक पाय पडला. त्यांनी तो मोबाईल उचलला आणि कुणाचा आहे याचा तपास सुरु केला.
मोबाईल मालकाचा शोध न लागल्यामुळे त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. ज्या युवकाचा मोबाईल हरवला तो स्टेट बँकेच्या बाहेर मोबाईल खिशात नाही म्हणून रडकुंडीला आला होता. त्यावेळी पाचोरा तालुक्यातील कॉग्रेसचे प्रसिद्ध नेते सचिनदादा सोमवंशी यांनी सदर युवकाची आपुलकीने चौकशी केली. काही वेळाने त्यांनी त्याच्या मोबाईलवर कॉल केला असता तो पोलीस कॉन्स्टेबल निलेश गायकवाड यांनी उचलला.
मोबाईल पोलिस स्टेशनला सुरक्षित असल्याचे समजल्यानंतर देवा गायकवाड याचा जिव भांड्यात पडला. कॉग्रेस नेते सचिनदादा सोमवंशी यांनी सदर युवकास पाचोरा पोलीस ठाण्यात नेले. त्याठिकाणी गेल्यावर पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते सदरचा मोबाईल देवा गायकवाड यास सुपुर्द करण्यात आला. या धकाधकीच्या युगात देवा गायकवाड याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक कॉग्रेसचे नेते सचिनदादा सोमवंशी यांच्यासह पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी केले. यावेळी पोलीस हवालदार हंसराज मोरे, पो. नाईक विकास खैरे, पो. कॉ. योगेश पाटील, किरण पाटील, निलेश गायकवाड, राहुल बेहरे, राहुल सोनवणे, अमृत पाटील असे सर्व जण उपस्थित होते. मोबाईल हातात आल्यानंतर देवा गायकवाड याने कॉग्रेस नेते सचिनदादा सोमवंशी यांच्यासह पो.नि.किसनराव नजनपाटील, वृत्तपत्र विक्रेते सुरेश गायकवाड आणि पो. कॉ. निलेश गायकवाड यांचे आभार मानले.