पुणे : सध्या सुरु असलेल्या लग्नाच्या धामधुमीत दागिने चोरीचे प्रकार होत आहेत. ते प्रकार पोलिसांच्या मदतीने उघड देखील होत आहेत. मात्र सतर्कता बाळगणे हे प्रत्येक व-हाडी मंडळींचे देखील काम आहे. लग्न समारंभ म्हटला म्हणजे बहुतांश विवाहित महिलांना अंगावर दागिने घालून त्याचे प्रदर्शन करण्याची हौस असते. अशा वेळी चोरट्यांची चोरटी नजर महिलांच्या दागिन्यांवर विशेषत: मंगळसुत्रांवर खिळलेली असते. त्यासाठी सतर्कता महत्वाची असते.
पुणे येथील एका लग्नात एका महिलेचे चक्क दहा तोळे वजनाचे दागिने चोरीला गेले. जवळपास अडीच लाख रुपये किमतीचे हे सोन्याचे दागीने चोरीला गेल्यामुळे लग्न समारंभात मोठी खळबळ उडाली. मात्र चोरटा वर पिता असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्यानंतर त्याहून जास्त खळबळ उडाली.
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एक लग्न सोहळा होता. या लग्न समारंभात खडकवासला येथील एक महिला लग्नासाठी आली होती. या लग्नाच्या प्रसंगात तिचे तब्बल दहा तोळे वजनाचे दागीने चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रकरण सिंहगड रस्ता पोलिसात गेले. केवळ चार तासात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत दत्ता दगडू गोऱ्हे (घुलेनगर, वडगांव बुद्रुक, पुणे) या वर पित्यास अटक केली. फिर्यादी महिलेने याबाबत सिंहगड रस्ता पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.
सदर महिला नातेवाईकाच्या लग्नासाठी वडगाव बुद्रुक परिसरात आली होती. सोमवारी हळदीचा कार्यक्रम होता. त्यामुळे सदर फिर्यादी महिला वडगांव बुद्रुक येथील भावाच्या घरी मुक्कामी होती. फिर्यादी महिलेने लग्नात घालण्यासाठी दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणले होते. आरोपी व फिर्यादी महिलेचे घर जवळ जवळ होते.
हळदीच्या कार्यक्रमासाठी फिर्यादी महिला व तिच्या भावाच्या घरातील सर्वजण हजर होते. दरम्यान फिर्यादी महिलेच्या भावाच्या घराचे दार उघडे राहिले होते. आरोपी दत्ता गो-हे यांनी घरात जावून कपाटातील 2 लाख 44 हजार 665 रुपयांचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
लग्न समारंभात घालण्यासाठी सोन्याचे दागीने महिलेने कपाटात तपासले असता ते गायब दिसले. अखेर तिने सिंहगड पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास धोत्रे यांनी तपास सुरु केला. केवळ चार तासात उलगडा करत वरपित्यास त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत गुन्हा कबुल केला. त्याला अटक करण्यात आली.
He is goon, thanks to God for the panishment