नांदेड : नांदेड शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत खाते उघडण्यात आले होते. या सहकारी बॅंकेचे खाते हॅक करुन त्यातील 14 कोटी 50 लाख रुपये हॅकरने 289 विविध खात्यात वळते केले आहे. गेल्याच महिन्यात शंकर नागरी सहकारी बॅंकेने आयडीबीआय बॅंकेत खाते उघडले होते.
शंकर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आहेत. या प्रकाराबाबत त्यांनी आयडीबीआय बँकेवर आरोप केले आहेत. आरटीजीएस सुविधा सहकारी बँकेत नसल्यामुळे त्यांनी गेल्याच महिन्यात ‘आयडीबीआय’ बॅंकेत खाते उघडून रक्कम 14 कोटी 50 लाख रुपये डिपॉझिट केले होती.
हा प्रकार शंकर नागरी सहकारी बॅंकेने आयडीबीआय बॅंकेच्या लक्षात आणून दिल्याचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी म्हटले आहे. मात्र आयडीबीआय बॅंकेने चालढकल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 17 डिसेंबर पासून 2 जानेवारी पर्यंत हा प्रकार सुरुच होता. या बाबत आयडीबीआय बॅंकेला वेळोवेळी ओटीपी आणि विवरणची मागणी देखील करण्यात आली होती असा आरोप पोकर्णा यांनी केला आहे. मात्र टाळाटाळ करण्यात आली. या सर्व प्रकाराला आयडीबीआय जबाबदार असल्याचे ओमप्रकाश पोकर्णा यांनी म्हटले आहे. या सायबर हल्ला प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबई येथून आयटी पथक येणार आहे. त्यानंतर या प्रकाराचा उलगडा होणार आहे. हे पथक नांदेड येथे दाखल होणार आहे.