जळगाव : लासुर ता.चोपडा येथील मारहाणीच्या घटनेत झालेल्या मृत्यूप्रकरणी फिर्याद देणारा भाऊच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सख्ख्या भावाला मारल्यानंतर त्याच्या मृत्यूप्रकरणी दुस-यावर खूनाचा आरोप केल्याचा बनाव पोलिस तपासात समोर आला आहे.
रतीलाल जगन्नाथ माळी यास मारहाण केल्याने त्याचा मुत्यू झाला होता. या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. पोलीस तपासाअंती यातील फिर्यादीच आरोपी म्हणून समोर आला आहे. भावानेच सख्या भावाची हत्या करत त्याच्या खुनाचा आरोप दुस-यावर केल्याचा बनाव उघड झाला आहे. त्याला अटक केली आहे.
प्रदीप उर्फ आबा जगनाथ माळी (28) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 5 तारखेला मध्यरात्रीच्या वेळी रतिलाल जगन्नाथ माळी याने घरात प्रवेश केला म्हणून चारित्र्याचा संशय घेत त्याला घरात जावून लाथाबुक्यांसह लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत रतिलाल माळी याचा मृत्यु झाला होता. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला मयत रतीलाल याचा भाऊ प्रदीप माळी याने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार लासुर गावातील चार जणांविरुद्ध भा.द.वि. 302, 452, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात प्राप्त झालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रदीप माळी याचा भाऊ रतीलाल याने यापुर्वी देखील महिलांची छेडखानी केली होती. त्यामुळे त्याचे लग्न जमण्यात अडचणी येत होत्या. त्याची गावात बदनामी झाली होती.
या रागातून प्रदिप माळी याने भाऊ रतीलाल माळी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जवाबातून हा प्रकार पुढे आला. त्यामुळे भाऊ रतीलाल माळी याचा खून करणारा प्रदिप माळी यास 9 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संदिप आराक करत आहेत.