मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण आणि परीक्षा सुरु असल्या तरी महाविद्यालये सुरु होण्याबद्दल संभ्रम सुरुच आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेत पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून 20 जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत ते विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी बोलत होते.
उदय सामंत यांनी या फेसबुक लाइव्हद्वारे महाविद्यालये सुरु करणे, प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियेतील अडथळे अशा विविध विषयावर चर्चा केली. लवकरच येत्या दहा दिवसांत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनीमय करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यादृष्टीने चर्चा व प्रयत्न देखील सुरु आहेत.
विधि प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे प्रवेश होत नसल्याच्या तक्रारी देखील पुढे आल्या आहेत. येत्या मंगळवारपर्यंत विधी प्रवेशांना अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. लॉकडाऊनमुळे तंत्रशिक्षणाच्या पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशांमध्ये अडचणी आल्यामुळे या सर्व प्रवेश प्रक्रियेस 15 जानेवारीपावेतो अंतिम मुदतवाढ देण्याचे त्यांनी सांगितले आहे.