परभणी : कोरोनाशी मुकाबला करता करता देशवासीयांची चांगलीच दमछाक झाली आहे. कोरोनापासून काही प्रमाणात सुटका झाली असतांना आता महाराष्ट्रापुढे बर्ड फ्लूचे आव्हान उभे राहिले आहे. परभणी येथील मुरुंबा गावात आठशे कोंबड्या एकाच वेळी मृत्युमुखी पडल्या आहेत. या सर्व कोंबड्या बर्ड फ्लू मुळे मृत्युमुखी पडल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची सुरुवातीला केवळ अफवा होती. मात्र पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्षांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर प्रशासनाने मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. येथील नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात काल 10 जानेवारी रोजी पोल्ट्री फार्ममधील सुमारे चारशे कोंबड्या अचानकपणे मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पशुवैद्यकीय पथकाने याठिकाणी पाहणी केल्यानंतर केंद्रेवाडी परिसरात देखील अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. केंद्रवाडी गावात वाहनांना ये -जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. लातुरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी त्याबाबत आदेश जारी केले आहेत.