पोलिसाला मारहाण – आरोपीस सोडण्यासाठी राम कदमांची मध्यस्ती

मुंबई : पवई पोलिसांच्या एका कर्मचा-यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेप्रकरणी आमदार राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचे समोर आले आहे. मारहाण करणारे आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचा बचाव करण्यासाठी राम कदम यांनी फोन केल्याचे म्हटले जात आहे.
नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. खैरमोडे यांना बीजेपीच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या तिघा कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या तिघा मारहाण करणा-या कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी आ. राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला. राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे.
“तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही परंतू मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा असे आ. राम कदम म्हणत आहेत. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न असून त्यांचे लग्न देखील झालेले नाही”, असे म्हणत आ. राम कदम यांनी खैरमोडे यांच्याकडे दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची मागणी केली आहे.
हा महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न असून असे करणे उचीत होणार नसल्याचे मारहाण झालेल्या कर्मचा-याने आ. राम कदम यांना ठामपणे म्हटले आहे. पोलिस कर्मचा-यास मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी फोन करणा-या आ. कदम यांच्या भुमिकेवर रा.कॉ. ने टिका केली आहे.
पवईच्या हिरानंदानी येथील एका मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या वाहनाला भाजप कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन येत जोरदार धडक दिली होती. भाजपचे हे तिघे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळार पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हजर झाले होते. त्यांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर रिक्षाने नेत असताना कार्यकर्त्यांनी रिक्षातच खैरमोडे यांना मारहाण केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार करण्यात आले होते. या बेदम मारहाणीत खैरमोडे जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here