सुकी नदीच्या पुलाला बळी हवेत काय? ग्रामस्थांचा तिव्र संताप

हमीद तडवी
रावेर : रावेर तालुक्यातील लोहारा गावानजीक सुकी नदीवरील पुलाच्या घाट रस्त्याने जाणारे ट्रॅक्टर 11 जानेवारी रोजी नदीपात्रात कोसळले. या घटनेत ट्रॅक्टरमधे बसलेल्या शेतमजुर महिला देखील खोल नदीपात्रात जावून कोसळल्या. या घटनेत एकच हल्लकल्लोळ आणि आरडाओरड सुरु झाली. यात काही कित्येक शेतमजूर महिला जखमी झाल्या. त्यापैकी तिन शेतमजुर महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या. तिघा गंभीर जखमी महिलांवर उपचार सुरु आहेत. या घटनेत सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. मात्र प्राणहाणी होण्याची वाट बांधकाम विभागाचे अधिकारी बघत आहेत काय? असा संतापजनक खडा सवाल परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत. अजून काही अपघात या पुलावरुन होण्याची संबंधीत अधिकारी व राजकारणी वाट बघत आहेत काय? अशा तिव्र प्रतिक्रिया रावेर तालुक्यातून उमटत आहेत. या पुलाची देखभाल व दुरुस्ती होण्याची एकमुखी मागणी या अपघाताच्या निमीत्ताने पुढे आली आहे.

बांधकाम विभागाच्या अधिका-यांसह संबधित राजकीय पुढारी व मंत्री यांच्या जाणीवपुर्वक दुर्लक्षामुळे या पुलावरुन कधी किरकोळ तर कधी मोठे अपघात होतच असतात. नुकत्याच झालेल्या ट्रॅक्टर अपघातामुळे हा पुल नव्याने चर्चेत आला आहे.

रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी लोहारा हे गाव वसले आहे. या परिसरात लोहारा, गौरखेडा, कुंभारखेडा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. दैनंदिन शेतीच्या कामासाठी येथील शेतकरी व शेतमजुर नेहमीच या पुलाने प्रवास करत असतात. या परिसरातील शेतकरी वर्गाला या पुलाशिवाय पर्याय नाही. हा पुल आता जिर्ण झाला असून त्याची अवस्था दयनीय झाली आहे. निदान आता तरी बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने या पुलाच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करु नये अशी मागणी पुढे आली आहे. या पुलाच्या रस्त्यावरच आमचा जिव जाणार काय? असे देखील परिसरातील नागरीक आता खुलेआम बोलू लागले आहेत. कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला आता तरी या पुलाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी जाग यावी असे बोलले जात आहे. आगामी निवडणूकीत मते मागण्यासाठी येणा-या राजकीय पुढा-यांना देखील या पुलावरुन प्रवास करणा-या नागरिकांनी आता पुल दुरुस्तीचे आवाहन केले असून आव्हान देखील दिले आहे. प्रसंगी उपोषणाचे अस्त्र देखील उपसण्याचे बोलले जात आहे.

यासोबतच वडगाव चिनावल रस्त्यवरील पुलाची देखील अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षापासून हा पुल पुराच्या पाण्यामुळे वाहुन गेला आहे. त्यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटलेला आहे. या बाबतचे निवेदन रा.कॉ. चे कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी नुकतेच आमदार शिरीष चौधरी यांना देण्यात आले आहे.

या पुलावरून चिनावल जाणि वडगाव परिसरातील असंख्य शेतकरी व शेतमजूर दररोज ये जा करत असतात. वाहन चालक पूलाच्या बाजुने अतिशय जिवघेणा प्रवास जिव मुठीत धरुन करत असतात. त्यामुळे रिक्षा उलटण्याचे प्रकार घडत असतात. दुचाकी स्लिप होण्याचे देखील प्रकार अधुनमधून घडतच असतात. या अपघातामुळे वाहनांच्या दुरुस्ती खर्चात नेहमीच वाढ होत असते. या खर्चाला प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक आमदारांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी एकमुखी मागणी पुढे आली आहे. याबाबतची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा समाजसेवक विलास ताठे , तालुकाध्यक्ष किरण पाटील राष्ट्रवादी पदवीधर रावेर आणि चिनावल वडगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here