बर्ड फ्लूचा अहवाल आल्याने कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रीया सुरु

लातूर : लातुर जिल्ह्याच्या अहमदपुर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील 350 आणि सुकणी येथील 80 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या होत्या. या मृत झालेल्या कोंबड्यांचे प्रत्येकी पाच नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत रवाना करण्यात आले होते. या नमुन्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यात पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुकणी येथील 16 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तसेच केंद्रेवाडी येथील 8 हजार पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका पोल्ट्रीफार्ममधील 350 पक्षी मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर सुकणी येथील एका धाब्यावर 80 पक्षी मृत झाले. मृत कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत दोन दिवसांपुर्वी पाठविण्यात आले होते. त्यापुर्वी खबरदारीचा उपाय म्हणून पोल्ट्री फार्म परिसरातील दहा कि.मी. अंतर प्रभावक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

आता अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या पोल्ट्री फार्ममधील पक्षी नष्ट करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. पडिले यांनी दिली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ज्या ठिकाणचे पक्षी मृत झाले आहेत आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तेथील एक किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जातात. केंद्रेवाडी येथील पोल्ट्रीफार्ममध्ये 8 हजार पक्षी आहेत. ते पक्षी नष्ट केल्यानंतर एक कि.मी. परिघातील कोंबड्या नष्ट केल्या जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

सहा आठवड्याच्या आतील एका पक्षाला 20 रुपये तर सहा आठवड्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक पक्षास 70 रुपयाप्रमाणे आर्थिक मदत कुकुटपालन व्यावसायिकास देण्यात येईल. केंद्रेवाडी येथील बहुतेक पक्षी सहा आठवड्याच्या आतील वयोगटातील आहेत. सुकणी येथील नष्ट केलेलेले 16 पक्षी सहा आठवडयाहून अधिक वयाचे असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी पडीले यांनी म्हटले आहे. उदगीर तालुक्यातील वंजारवाडी भागातील 55 पक्षी दगावले असून त्यांचा अहवाल प्र्योगशाळेत प्रलंबीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here