जळगाव : अमळनेर तालुक्यातील एका शैक्षणीक संस्थेची जागा शेतजमीनीवर होती. शेतजमीनीवर असलेल्या त्या संस्थेला दंड भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. संस्था चालकाने नोटीसीनुसार महसुल विभागाकडे नियमानुसार 32 हजार 426 रुपयांचा दंड देखील भरला. मात्र दंड भरल्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात तलाठ्याने संस्था चालकास 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
अमळनेर तालुक्यातील त्या संस्था चालकास लाचेची रक्कम देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे शैक्षणीक संस्था चालकाने थेट लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेत योग्य ती कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली. त्यानुसार योग्य ती कायदेशीर पुर्तता केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात 15 हजार रुपयांची लाच स्विकारतांना जवखेडा ता. अमळनेर येथील तलाठी मुकेश सुरेश देसले यांना अडकले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर पुढील कारवाईचा फास आवळण्यात आला.
लाच लुचपत प्रतिबंधक जळगाव विभागाचे उप अधिक्षक गोपाल ठाकुर यांच्या अख्त्यारीखाली पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सहायक फौजदार रविंद्र माळी, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, पो. हे. कॉ. सुरेश पाटील, पो. ना. मनोज जोशी, पो. ना. सुनिल शिरसाठ, पो. ना. जनार्धन चौधरी, पो. कॉ. प्रविण पाटील, पो. कॉ. नासिर देशमुख, पो. कॉ. ईश्वर धनगर यांनी कारवाईत सहभाग घेतला.