धनंजय मुंडे आणि “लिव्ह इन” च्या विषकन्येचा फटका

यंदाच्या वर्षारंभी राज्याच्या महाविकास आघाडीतील तरुण मंत्री धनंजय मुंडे यांना “लिव्ह इन” च्या विषकन्येचा जोरदार फटका अनुभवायला मिळाला. बॉलीवुड मधे संधी देण्याच्या बहाण्याने धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत त्याबद्दलची तक्रार ओशीवरा पोलिस स्टेशनला केल्याने राजकारणासह महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात खळबळ उडाली आहे.

कथीत तक्रारकर्ती केवळ एवढ्यावरच थांबली नाही. तिने आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मदत मागीतल्याचे याप्रकरणी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधे म्हटले आहे. त्यामुळे लागलीच मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचे काय? मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? अशा दोन प्रश्नांची “बत्ती लगाव” करुन जणू आता मुंडे यांच्या “मंत्रीपदाची आहुती” पडणार की काय? अशी हवा तापल्याचे दिसले.

निदान मराठवाड्यात तरी अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार! राजकारणात डोईजड होऊ पाहणा-या नेत्यांच्या “तंगड्याखेचू” खेकडा उद्योग महाराष्ट्राला नवा नाही. इथे उगाचच कुणाची वकीली करण्यासाठी हा लेखन प्रपंच नाही हे समस्त वाचकांनी सर्वप्रथम लक्षात घ्यावे. नाण्याच्या दोन्ही बाजू खणखणीत वाजवून झाल्यावर दांभीकतेच्या मुस्काटात सणसणीत हाणण्याचा “तुकोबांचा” संदेश स्मरण करुन देण्यासाठी सज्जनतेला मैदानात उतरणे अत्यावश्यक ठरते. ती संधी “सांप्रत” च्या प्रकरणाने दिली आहे. त्यावर महाराष्ट्राच्या संस्कृती रक्षकांनी अवश्य विचारमंथन करावे.

सांप्रतच्या खळबळजनक आरोपाच्या पार्श्वभुमीवर लागलीच धनंजय मुंडे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात आरोपकर्त्या तरुणीच्या बहिणीशी “लिव्ह इन रिलेशनशिप” मान्य करत या संमती संबंधातून दोन अपत्यांची जबाबदारी देखील मान्य केली. आपल्या कुटूंब – आप्त – स्वकीय मित्र परिवारात ही बाब सर्वज्ञात व सर्वमान्य असून त्या बालकांना पितृछत्रासह संगोपनाची जबाबदारी निभवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तक्रारकर्तीच्या बहिणीला मुंबईत सदनिका, विमा पॉलीसी, भावाला व्यवसाय स्थापण्यास मदत केली. सन 2019 पासून मात्र या दोन्ही बहिणी (लिव्ह इन रिलेशनशिप मधे असलेली आणि तिची आरोपकर्ती लहान बहिण) ब्लॅकमेल करत आहेत. त्यात भावाचा संबंध असून 12 नोव्हेंबर 2020 रोजी पोलिस तक्रार केली असून प्रकरण हायकोर्टात देखील गेल्याचे, कोट्यावधीच्या ब्लॅकमेलींगचे एमएमएस असल्याचे मुंडे यांचे स्पष्टीकरण आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपासंदर्भात कायदा त्याचे काम चोख बजावेल आणि न्यायप्रविष्ठ बाबींवर न्यायालयातून निकष येतील. त्यामुळे या प्रकरणात अधिक न शिरता वैयक्तीक पातळीवरचा निर्णय संबंधीत न्यायोचित यंत्रणेवर सोपवून सामाजिक – राजकीय अंगाने उपस्थित होणा-या प्रश्नांची – समस्येची चर्चा करुया!

महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समस्त महिला वर्गाचा आदर करावा ही भुमिका मान्य करुन काही तथ्ये – प्रकरणे यांचा समाजपुरुषाने अवश्य विचार करावा. प्राचीन समाजजीवनात राजेशाही असतांना “विषकन्ये”चा प्रयोग करुन एखाद्या राजाचा काटा काढला जात असे. आता आपण लोकशाहीत आलो आहोत. सन 1990 नंतर देशाच्या धोरणात उदरीकरणाला महत्व आले. सन 1900 ते 2020 अशा 120 वर्षाच्या देशाटनासह आमल्या सामाजिक जाणीवांचा कक्षा रुंदावल्या आहेत.

कधीकाळच्या कर्मकांडी – रुढीवादातून भारतीय समाज बाहेर पडला. वर्ण वर्चस्वाचे जोखड फेकून दिले गेले. स्पृश्य – अस्पृश्य असे वर्णभेद गळून पडले. सामाजिक समतेची विचारधारा स्विकृत झाली. आमच्या समाजजीवनात बिटीश राजवटीने आणलेली वस्त्रक्रांती, अलिकडे तर घराघरातून पाहीली जाणारी “माझ्या नव-याची बायको” सारख्या मालिकांनी मोकळेपणा आणला. नाहीतरी 150 वर्षापुर्वी गर्भश्रीमंतांनी बहुपत्नीत्व ही रित बनवली होती. स्वातंत्र्यानंतर “द्विभार्या” प्रतिबंधक कायदा आल्यावर उद्भवणा-या अडचणीवर जालीम उपाय शोधण्यात आले. गुजराथेतून करायचे लग्न असा प्रकार आल्याचे सांगतात.

अलिकडे “लिव्ह इन रिलेशनशिप” हा प्रकार समाजमान्य होतांना दिसतो. स्त्री पुरुष सहवासाच्या लग्नसंस्था व्यवस्थेला पुरक किंवा जोखड फेकून देण्यासाठी उपयुक्त म्हणून “लिव्ह इन” सोयीचे वाटत असले तरी आता या कथीत सोयीचा ब्लॅकमेलींग साठी वापर होऊ लागला आहे. हनीट्रॅप हे प्रकरण लाखो रुपयांच्या प्राप्तीचे “बिझिनेस मॉडेल” म्हटले जते. त्याच पठडीत आता “लिव्ह इन रिलेशनशिप” चपखल बसू लागल्याचे दिसते. एखादी “मालदार आसामी” गटवणे, त्यांच्या बेडरुम मधे एंट्री मारणे, लिव्ह इन मधे राहणे, त्या कालावधीत हवे तसे फ्लॅट, बंगले, मोटारगाड्या, धनसंपदा मिळवणे आणि ब्लॅकमेलींगद्वारे कोट्यावधीचा गठ्ठा कमवणे हा एक स्वतंत्र उद्योग ब-याच ललनांनी स्विकारल्याचे दिसते.

अशाच उद्योगातील काही विलोभनीय टवटवीत ललनांच्या या खेळाचा वापर करुन काही समाजमान्य राजकारणाधिष्ठीतांची शिकार करण्याचा उद्योग करुन नामानिराळे राहण्याची विद्या काही महाभागांनी अवगत केल्याचे दिसते. मध्य प्रदेशात काही वर्षापुर्वी अशाच एका प्रकरणात एका अध्यात्मिक गुरुने आत्महत्या केली. खान्देशात एका खासदाराच्या राजकारणाची अशाच शस्त्राने हत्या घडवण्यात आली. एका आमदाराचे राजकीय जीवन उध्वस्त करण्याची खेळी गाजल्याचे राज्याने पाहिले. आता “लिव्ह इन रिलेशनशीप” चे भुत थैमान घालु लागले आहे. आता संस्कृती रक्षकांसह लग्न संस्थेची ही परिक्षा आहे. समाज पुरुष काय स्विकारणार? त्याची प्रतिक्षा करुया!

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव )
8805667750

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here