नाशिक : नाशिक शहरात एका लॉजमधे तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका हॉटेलच्या रुममधे ठाण्यातील बोईसर येथील तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. सीबीएसवरील एका हॉटेलच्या रुममधे आज बुधवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणीसोबत मुक्कामी असलेल्या संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणीचे तोंड दाबून तिची हत्या केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे.
नाशिक शहरातील सीबीएस सिग्नलजवळील असलेल्या हॉटेलच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय प्रवीण धानवा (21) रा.मासवन, कोळीपाडा, पालघर आणि अर्चना सुरेश भोईर (20),रा. कल्लाले मान, बोईसर हे युगल मुक्कामासाठी आले होते.
बुधवारी सायंकाळी अर्चनाचे आई वडील व इतर नातेवाईक अचानक हॉटेलमधे आले व संबंधीत रुमच्या दिशेने सरसावले. त्यानंतर हॉटेलमधे खळबळ माजली. रुममधील बेडवर अर्चना मयत अवस्थेत आढळून आली. त्यावेळी तन्मय येथेच एका कोपऱ्यात बसून होता. व्यवस्थापकाने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले. तरुणी मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीकामी ताब्यात घेत खूनाच्या संशयातून अट्क केली आहे. याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.