जळगाव: मद्याचे घोट रिचवत परमिट रुम बियर बारची तपासणी करणारे उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक नरेंद्र दहिवडे यांचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसारीत झाला होता. मद्य प्राशन करत असतांना सरकारी कामकाज करणे दहिवडे यांच्या अंगाशी आले आहे. उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणी जळगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात तसे आदेश प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ जळगावात आले होते. त्यांनी या प्रकरणी संपूर्ण चौकशी केली. जिल्हा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी याबाबतचा अहवाल तयार करुन तो उपायुक्तांना सादर केला. त्यांनी राज्याचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्याकडे हा अहवाल रवाना केला. त्यावर सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई झाली व तसे आदेश आज प्राप्त झाले. निलंबन काळात त्यांना जळगाव मुख्यालय देण्यात आले आहे. तथापी हा व्हिडीओ सन 2018 मधील जळगावच्या एका हॉटेलमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे.