अशोकभाऊंची लाभली साथ – गिर्यारोहकास मदतीचा हात

जळगाव : आफ्रिका खंडातील सर्वोच्च अशा किलोमाजरो शिखरावर 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकवण्यासाठी गिर्यारोहकांचे पथक जाणार आहे. या गिर्यारोहकांच्या पथकात बालाघाट येथील अनिल वसावे (ता. अक्कलकुवा) यांची निवड झाली आहे. अनिल वसावे यांच्या स्वप्नांना जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या रुपाने अशोक जैन यांचा मोलाची साथ आणी मदतीचा हात मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर अनिल वसावे यांची बातमी प्रकाशित झाली होती. त्याचवेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या उपक्रमासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे ठरवले होते. आर्थिक सहकार्यासोबत हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती साधन-सामग्री देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

360 एक्सप्लोअरच्या वतीने 20 ते 26 जानेवारी या कालावधीत ‘किलोमांजरो’ सर केले जाणार आहे. एव्हरेस्ट वीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चढाईसाठी विविध स्पर्धेतून भारतातील दहा गिर्यारोहकांची निवड झाली आहे. या गटात अनिल वसावेंची निवड करण्यात आली आहे. अनिल वसावे अतिदुर्गम भागातील बालाघाट, ता. अक्कलकुवा येथील रहिवासी आहे. त्याच्या गावापर्यंत वाहन देखील जात नाही. बालाघाट येथून एक कि.मी. अंतर पायी चालल्यानंतर तो राहत असलेल्या देवबारीपाडा ही वस्ती आहे.या वस्तीजवळच सातपुड्याचा भलामोठा डोंगर आहे. या डोंगरावर चढ-उताराच्या सवयीतून त्याला गिर्यारोहणाचे वेड निर्माण झाले. त्यातूनच त्याने आतापर्यंत महाराष्ट्रातील कळसूबाई, अजिंक्यतारा, गटेश्वर, हरिश्चंद्र गड आणि सातपुड्यातील अस्तंबा, चेन्नई येथील शिखर सर करण्यात यश मिळवले आहे. त्याची गुणवत्ता लक्षात घेत आंतरराष्ट्रीय कोच आनंद बनसोडे यांनी त्याची किलीमांजरोसाठी निवड केली. दक्षिण अफ्रिकेतील किलोमाजरोचे शिखर सर करण्याची सुरुवात 22 जानेवारी रोजी भारतीय पथक मोशीपासून केली जाणार आहे. अनिल विसावे हा आदिवासी समाजघटकातील कदाचित पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक ठरणार आहे.

अशोकभाऊंच्या दातृत्वामुळे किलोमाजरो मोहीम होणार शक्य – अनिल वसावे
किलोमाजरो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर करण्याची संधी माझ्याकडे चालून आली आहे. मात्र घरातील प्रतिकुल परिस्थितीमुळे मी स्वतः खर्च करुन किलोमांजरो येथे जाऊ शकत नाही. ही संधी हातची निसटते की काय असे मला वाटत होते. अशा प्रसंगी एका वृत्तपत्रातील बातमी वाचल्यानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला. केवळ आर्थिक पाठबळच नव्हे तर या मोहिमेसाठी लागणा-या विविध बाबींची पूर्तता देखील अशोकभाऊ जैन यांनी पुरवण्याबाबत सांगितले. अशोकभाऊंसारख्या दातृत्ववान व्यक्तींमुळे माझे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळणार असल्याचे अनिल वसावे याने म्हटले आहे.

जैन स्पोर्टस् अकॅडमीतर्फे हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत – अशोकभाऊ जैन
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व जैन परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी जोपासून जे काही उत्तम आणि उदात्त आहे त्याला सहकार्य केले जाते. जैन स्पोर्टस् अकॅडमी तर्फे क्रीडा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून चांगले कार्य केले जात आहे. जैन अकॅडमीतर्फे चमकदार कामगिरी करणाऱ्या अशा हिऱ्यांचा शोध घेतला जातो व त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी आवर्जून मदत नक्कीच दिली जाते. जागतिक पातळीवर विक्रम नोंदवू पाहणारे गिर्यारोहक अनिल वसावेंच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही मदतीचा हात पुढे केला असून त्यांची मोहीम यशस्वी होण्यास आम्ही शुभेच्छा देत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here