जळगाव : रती अर्थात कामदेवाची पत्नी आणि लाल अर्थात चिरंजीव असा रती आणि लाल या शब्दांचा अर्थ होतो. रतीलाल माळी हा तरुण कित्येकदा त्याच्या नावाप्रमाणे कामुक वर्तन करत होता. गावातील महिलांचा त्याने काही वेळा विनयभंग केला होता. त्याच्या अशा वागण्यामुळे तो पुरता बदनाम झाला होता. त्याच्या चुकीच्या वागण्याचा त्याच्या कुटूंबाला देखील त्रास होत असे. त्याचे आईवडील आणि लहान भाऊ त्याला पार वैतागले होते.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी चोपडा तालुक्यातील गावात रतीलाल रहात होता. रतीलालच्या अंगी अधुनमधून कामदेवतेचा संचार होत असे. सुर्यास्तानंतर त्याच्या अंगी मादकता येत असे. एखादी देखणी तरुण विवाहीता त्याच्या मनात भरली म्हणजे तो सरसावत असे. मनात भरलेल्या विवाहितेचा विनयभंग करण्याची इच्छा त्याच्या अंगी निर्माण होत असे. इच्छेचे रुपांतर तो थेट वर्तनात करण्यास मागे पुढे बघत नव्हता. त्याचे लज्जाहीन वर्तन लक्षात घेत त्याच्या पालकांनी सन 2011 मधे त्याचे लग्न लावून दिले होते. लग्नानंतर देखील महिलांचा विनयभंग करण्याचे त्याचे कारनामे अधूनमधून सुरुच होते.
विवाहानंतर काही वर्ष त्याचा संसार ब-यापैकी सुरु होता. मात्र काही ना काही कारणामुळे त्याचे पत्नीसोबत खटके उडू लागले. जवळपास सहा वर्ष संसार केल्यानंतर पत्नीने त्याच्यासोबत काडीमोड घेण्यचा निर्णय घेतला व तो अमलात देखील आणला. सन 2017 मधे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. पत्नी निघून गेल्यामुळे रतीलाल एकटा पडला. एकाकी रतीलाल आईवडीलांसोबत राहू लागला.
एकटा जिव असलेल्या रतीलाल यास आता कुणाचे बंधन राहिले नव्हते. तो मोकाट सुटला होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन देखील जडले होते. रात्र अर्थात निशा झाली म्हणजे त्याचे पाय मद्याच्या दुकानाकडे अर्थात ग्रामीण भाषेतील दारुच्या गुत्त्याकडे आपोआप वळत होते.
दारुच्या नशेत असतांना एखादी विवाहिता मनात भरली म्हणजे तो तिचा विनयभंग करण्यास सरसावत नव्हे तर झेपावत असे. त्याचे आई वडील व लहान भाऊ प्रदीप यांना रतीलालचे कारनामे त्रासदायक ठरत होते. त्याच्या तक्रारी घरापर्यंत येत होत्या. त्यामुळे त्या तक्रारींचा मुकाबला करणे त्याच्या आईवडीलांना नाकेनऊ येत होते.
रतीलालचा भाऊ प्रदीप हा अविवाहीत होता. रतीलालच्या कारनाम्यांची ख्याती गावात आणि समाजात पसरली होती. रतीलालच्या करतुती लक्षात घेत समाजाबांधव या घरात सुन म्हणून मुलगी देण्यास मागे पुढे बघत होते. त्यामुळे रतीलालचा लहान भाऊ प्रदीपचे लग्न जुळण्यास अडचणी येत होत्या. रतीलालची पत्नी काडीमोड घेत माहेरी निघून गेली होती. हा भाग देखील उपवर मुलींचे नातेवाईक लक्षात घेत होते. रतीलालचे गावातील वर्तन उपवर मुलींच्या पालकांच्या कानावर विविध माध्यमातून पडत होते. उपवर मुलींचे पालक या कुटूंबाची पार्श्वभुमी लक्षात घेत होते. त्यामुळे उपवर प्रदिपचा विवाह जुळण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. रतीलालच्या वर्तनावर त्याचा लहान भाऊ प्रदीप मोठ्या प्रमाणावर नाराज होता. रतीलालने त्याचे वर्तन दुरुस्त करुन घ्यावे आणि चांगले रहावे अशी सर्वांचीच इच्छा होती. रतीलाल यास समजावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.
4 जानेवारीच्या रात्री रतीलालचे पाय मद्यप्राशन करण्यासाठी मधुशाळेकडे वळले. मद्यप्राशन केल्यानंतर त्याचे तनमन एका वेगळ्याचे दुनियेत तल्लीन झाले. मद्याची झिंग त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. रस्त्याने चालतांना त्याला जमीन कधी खोल तर कधी उंच वाटत होती. आकाश कधी जवळ तर कधी लांब वाटत होते. तो रहात असलेल्या गावातील 21 वर्षाची विवाहिता त्याच्या मनात भरली होती. ती घरात एकटी असल्याचे त्याला समजले.
मदिरेची नशा आणि ती विवाहीता घरात एकटी असल्याची बातमी त्यातल्या त्यात रात्रीची वेळ यांचा संगम जुळून आला. मद्याच्या नशेत त्याने थेट त्या विवाहितेचे घर गाठले. ती विवाहीता घरातील बेडवर एकटीच पहुडलेली होती. मधुशाळेतील मधुरस घेतलेल्या रतीलालने थेट तिचा बिछाना गाठला व तिच्या शेजारी जावून पडला. रात्रीचे साडेबारा वाजुन गेले होते. एवढ्या रात्री आपल्या शेजारी कुणीतरी झोपल्याचे त्या 21 वर्षाच्या विवाहितेला जाणवले. रतीलालच्या मुखातून येणारा मद्याचा उग्र दर्प सहन न झाल्यामुळे तिला जाग आली. कुणीतरी अनोळखी आपल्या शेजारी झोपल्याचे समजताच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
त्या विवाहितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे दोघे दिर तेथे पळत आले. दरम्यान मद्याच्या नशेतील रतीलाल सावध होत तेथून पलायन करण्यात यशस्वी झाला. त्याने शिताफीने आपले घर गाठले व घराचा दरवाजा आतून लावून घेत झोपी गेला. त्याचे आईवडील व लहान भाऊ प्रदिप असे जेवण आटोपून केव्हाच झोपी गेले होते.
दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी विनयभंग झालेल्या महिलेने रणकंदन सुरु केले होते. तिचे दोन्ही दीर रागाने लालबुंद झाले होते. आपल्या भावाच्या पत्नीचा विनयभंग झाल्यामुळे त्यांनी हातात काठी घेत रतीलालच्या घरी जाण्याची तयारी केली. विवाहीतेचे दोन्ही दिर रतीलालच्या घराजवळ आले. त्यांनी रतीलाल यास आवाज देण्यास सुरुवात केली.
मद्याच्या नशेतील रतीलालचा भाऊ प्रदीप जागा झाला. ज्याअर्थी मध्यरात्री रतीलालच्या नावाचा भर गल्लीत पुकारा सुरु होता त्याअर्थी नक्कीच काहीतरी कारनामा झाला असल्याची पुर्वकल्पना प्रदीप यास आली होती. त्याने बाहेर येत लागलीच घराची कडी बाहेरुन लावून घेतली. विनयभंग झालेल्या विवाहितेचे दोन्ही दिर रतीलाल यास मारण्याच्या उद्देशाने बाहेर उभे होते.
तुझा भाऊ रतीलाल हा आमच्या वहिनीजवळ ती एकटी असतांना आला होता. त्याने तिचा विनयभंग केला असल्याची माहीती दोघा तरुणांनी प्रदिप यास तावातावात दिली. विवाहितेच्या दोघा दिरांचे बोलणे ऐकून प्रदिप यालादेखील रतीलालचा राग आला. तरीदेखील प्रदीपने त्यांना समजावले की रतीलाल आता मद्यप्राशन करुन आलेला आहे. तो मद्याच्या नशेत आहे. आपण सकाळी या विषयावर बोलू. मात्र रागाने लालबुंद झालेल्या दोघांनी प्रदिपचे बोलणे ऐकले नाही. दरम्यान दोघांनी थेट घरात प्रवेश करत मद्याच्या नशेतील रतीलाल यास मारझोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान रतीलालचा बचाव करण्यासाठी गावातील दोघे तरुण प्रयत्न करत होते. त्यांना रतीलालची किव आली होती. मात्र विनयभंग झालेल्या विवाहितेच्या दोघा दिरांनी संतापच्या भरात रतीलाल यास मारहाण सुरुच ठेवली.
रतीलालमुळे प्रदिपचे लग्न जुळण्यास अडचणी येत होत्या. त्याच्यामुळे कुटूंबाची बदनामी थांबत नव्हती. त्यामुळे प्रदीपचा देखील राग उफाळून आला. सख्खा भाऊच भावाला मारण्यास आता सरसावला होता. प्रदीपने देखील भाऊ रतीलाल यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व दोघांना साथ दिली.
संतापाची लाट ओसरेपर्यंत दोघांसह प्रदिपने देखील सख्खा भाऊ रतीलाल यास मारहाण केली. त्यानंतर विनयभंग झालेल्या विवाहितेचे दोघे दीर त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर प्रदीपने रतीलाल यास तशाच अवस्थेत अंगावर पांघरुन टाकून झोपवून दिले व तो देखील झोपून गेला. चेह-यासह अंगावर लाथाबुक्क्यांसह काठीचा मार बसल्यामुळे जखमी झालेला रतीलाल अर्धमेला झाला होता. सुर्योदयापुर्वीच त्याने आपला जिव सोडून दिला. रतीलालने 5 जानेवारीचा सुर्योदय पाहिलाच नाही.
रतीलाल हे जग सोडून कायमचा देवाघरी गेला होता. आपल्याच भावाला मारहाण करण्यात आपला सहभाग असल्याचे लपवण्याचे मनाशी ठरवत प्रदिपने सकाळी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले. चौघांच्या मारहाणीत भाऊ रतीलालचा मृत्यू झाल्याचे प्रदिपने स.पो.नि. संदिप आराक यांना सांगितले. त्या चौघांमधे विनयभंग झालेल्या विवाहितेचे दोघे दिर आणि मारहाण सोडवण्याचा प्रयत्न करणा-या दोघा निरपराधांची नावे त्याने कथन केली. अशा प्रकारे चौघा जणांची नावे सांगत प्रदिप माळी याने स्वत:चे नाव मात्र लपवून ठेवले.
मारहाणीत रतीलाल माळी याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. मात्र त्याला मारहाण करणा-यांमधे त्याचा सख्खा भाऊ प्रदिप हा देखील होता. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला चौघा जणांची नावे फिर्यादीत घेण्यात आली. त्यात विनयभंग झालेल्या विवाहितेचे दोघे दीर व इतर दोघे जण होते. प्रदिप माळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 4/21 भा.द.वि. 302, 452, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्याद दाखल झाल्यानंतर आपण या खूनाच्या गुन्ह्यातून सहीसलामत सुटून जावू असे प्रदीप यास मनोमन वाटत होते. उप विभागीय पोलिस अधिक्षक राजेंद्र रायसिंग तसेच स.पो.नि. संदिप अराक यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलीत करण्यात आले. घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी करण्यात आली. मयत रतीलाल याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी रुग्णालयात रवाना करण्यात आला. सर्व कायदेशीर सोपास्कर पुर्ण करतांना फिर्यादीनुसार चौघा संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. मारहाणीत सहभाग घेणारा व मृत्यूस कारणीभुत ठरणारा सख्खा भाऊ मात्र फिर्यादी बनून नामानिराळा राहण्याची खेळी करत होता.
या खून प्रकरणाचा तपास सुरु असतांना चोपडा उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक राजेंद्र रायसिंग हे स्वत: तपासकामी गावात ठाण मांडून बसले. त्यामुळे स.पो.नि. संदिप अराक यांनी देखील आपल्या सहका-यांसह स्वत:ला तपासकामी झोकून दिले. तपासात साक्षीदार व गावक-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रतीलाल माळी याने यापुर्वी देखील गावात महिलांची छेडखानी केली होती. गावात व समाजात रतिलालमुळे त्याच्या परिवाराला बदनामीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रदीपचे लग्न जुळण्यात खुप अडचणी येत होत्या. त्या रागाच्या भरात प्रदीपने विवाहितेच्या दोघा दिरांसोबत सख्खा भाऊ रतीलाल यास बेदम मारहाण केल्याचे तपासात उघड झाले.
प्रदीपने सख्खा भाऊ रतीलालच्या छातीवर, मानेवर व गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे फिर्यादी हादेखील आरोपीच्या पिंज-यात आला. फिर्याद देणा-या प्रदिप माळी विरुद्ध पुरावे जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे फिर्याद देणा-या प्रदीप माळी याला आरोपी करण्यात आले. तसेच संशयीत म्हणून त्याने दिलेल्या इतर दोघा तरुणांची देखील तपासणी करण्यात आली. त्यात गावातील इतर दोघा तरुणांनी मारहाणीस प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले. त्यांची मारहाणीत कोणतीही भुमिका नसतांना त्यांची नावे नाहक गोवण्याचे काम फिर्यादी व तपासातील आरोपी प्रदीप माळी याने केले होते.
त्यामुळे विनयभंग झालेल्या विवाहितेच्या दोन्ही दिरांसह फिर्यादी (आरोपी) प्रदीप माळी अशा तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला तिघांना पोलिस कोठडी सुनावली.
या गुन्ह्याच्या तपासकामी चोपडा उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप अराक व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक अमर विसावे, पो.हे.कॉ. राजू महाजन, पो.हे.कॉ. भरत नाईक, पो.हे.कॉ. सुनील जाधव,पो.ना. देवीदास इशी, पोलिस नाईक संदिप धनगर, पोलिस नाईक विकास सोनवणे, पोलिस नाईक विष्णू भिल, पोलिस नाईक रितेश चौधरी, पो.कॉ. सुनिल कोळी यांनी सहभाग घेतला.