जळगाव : माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी भुसावळ येथे जाणा-या दुचाकीस्वार तरुणाचा पलीकडून येणा-या कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली. अजिंठा चौकापासून जवळच सालार नगर परिसरात हा अपघात झाला. यावेळी काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती.
समाधान श्रीराम चंदन (रा. तरसखेडा ता. येवला जिल्हा नाशिक) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत असलेला धवल अंबादास बच्छाव (गुजरखेडा ता. येवला जिल्हा नाशिक) हा जखमी झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे म्हटले जाते.
या घटनेनंतर सालार नगरातील रहिवाशांनी रास्ता रोको करत महामार्ग रोखून धरला होता. सोमवारी या प्रकरणी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या परिसरात अंडरग्राऊंड रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.