धर्मराज मोरे
धरणगाव : धरणगाव पोलिसांनी आज चोरीच्या विस दुचाकींसह सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे चोरीच्या दुचाकी खरेदी विक्री करणा-यांमधे खळबळ माजली आहे.
धरणगाव तालुक्यातील बोरगाव परिसरात एकाच क्रमांकाच्या दोन मोटारसायकल एका जणाकडे असल्याची गुप्त माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना खब-याकडून समजली होती. त्यानुसार त्यांनी आपले सहकारी पोलिस उप निरिक्षक अमोल गुंजाळ, पो.हे.काँ. खुशाल पाटील, पो.ना. मोती पवार, पो.काँ. दिपक पाटील, पो.ना. गजेंद्र पाटील, पो.ना. वसंत कोळी यांना तपासकामी रवाना केले होते.
संबंधीत मोटार सायकल धारकाकडे जावून खात्री केली असता त्याच्या ताब्यात एकाच क्रमांकाच्या दोन मोटारसायकल आढळून आल्या. त्याच्याकडून माहिती घेतली असता त्याने भुषण विजय पाटील (रा. पळासखेडा सिम ता. पारोळा) यांचेकडुन मोटरसायकल घेतल्याचे त्याने कथन केले. भुषण पाटील याने अनेकांना जुन्या मोटारसायकली विकल्या असल्याचे पोलिस पथकास समजले.
त्यानुसार भुषण विजय पाटील यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून भुषण धनराज पाटील व अमोल नाना पाटील (दोघे रा. शनी मंदीर पारोळा ) या दोघा मोटार सायकल चोरांची नावे पुढे आली. दोघांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. भुषण पाटील व अमोल पाटील यांनी गेल्या दिड वर्षात अनुक्रमे 9 आणि 2 मोटारसायकलची चोरी केल्याचे व त्या दहा हजारात विक्री केल्याचे उघड झाले. या सर्व मोटारसायकल त्यांनी चिंचपुरा, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर अशा विविधा गावातून चोरी केल्या आहेत. चोरीच्या मोटारसायकली त्यांनी भुषण विजय पाटील पळासखेडासिम ता. पारोळा, जयेश रविंद्र चव्हाण रा. जवखेडा ता. अमळनेर, ज्ञानेश्वर राजेंद्र धनगर रा. वर्डी ता.चोपडा, पंकज मधुकर खजुरे रा. राजु नगर पारोळा यांच्या माध्यमातून विक्री केल्या आहेत.
अशा प्रकारे सर्व सहा जणांना ताब्यात घेत सखोल तपासाअंती विस मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या. धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गु.र.न. 566/20 या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.