लाचखोर बॅंक अधिका-यास एक दिवस कोठडी

जळगाव : बँक ऑफ बडोदा येथून घेण्यात आलेले ट्रॅक्टरचे कर्ज थकल्यामुळे जप्तीची भीती घालत लाचेची मागणी करणारा बॅंक अधिकारी सीबीआय अंतर्गत एसीबीच्या सापळ्यात अडकल्याची घटना मंगळवारी घडली. सुभाष राणे (लोंढे – चाळीसगाव) या शेतक-याकडून विस हजार रुपये लाचेच्या रुपात घेणारा बॅंक वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे (औरंगाबाद) यास पुणे येथील सीबीआय अंतर्गत एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. लाचखोर साबळे यास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोंढे ता. चाळीसगाव येथील सुभाष काशिनाथ राणे यांनी सन 2010 -11 मधे देना बॅकेतून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता राणे यांनी भरला नव्हता. त्यामुळे कर्ज वसुली अधिकारी प्रशांत साबळे यांनी कर्जदार शेतकरी सुभाष राणे यांना ट्रॅक्टर जप्तीची भिती दाखवली. त्यानंतर राणे यांनी साबळे यांना ट्रॅक्टर जप्त न करण्याची विनंती केली. त्यापोटी दहा हजाराची मागणी साबळे यांनी केली. नाईलाजाने दहा हजार रुपये दिल्यानंतर प्रशांत साबळे यांनी काही दिवसांनी पुन्हा सुभाष राणे यांची भेट घेतली. कर्जाची रक्कम कमी करुन देतो असे म्हणत पुन्हा विस हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. त्यानंतर तक्रादार शेतकरी सुभाष राणे यांनी साबळे यांची पुणे सीबीआय अंतर्गत एसीबी कार्यालयात तक्रार केली.

पुणे एसीबीचे पोलिस निरिक्षक महेश चव्हाण यांनी 19 जानेवारी रोजी विस हजार रुपयांची लाच घेतांना बॅंक वसुली अधिकारी प्रशांत साबळे यास रंगेहाथ पकडले. त्यास अटक करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयात न्या. कटारीया यांच्या समक्ष साबळे यास हजर करण्यात आले. त्याला एक दिवस कोठडी सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here