नाशिक ग्रामीण एलसीबी व निफाड पोलिसांची कारवाई
नाशिक: कोणताही मुद्देमाल मिळाला नाही म्हणून दोन दुकानांना आग लावून देण्याचा प्रकार 29 जून रोजी निफाड पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या उगाव शिवारात घडला होता. या घटनेत प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले होते. याशिवाय विविध दुकानांचे कडीकोंडे तोडून रोख रकमेसह वस्तूंची चोरी करण्यात आली होती. या घटनेप्रकरणी निफाड पोलिस स्टेशनला रितसर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. के.के.पाटील व निफाड पोलिस स्टेशनचे पो.नि. रंगराव सानप यांच्यासह पथकाने घटनास्थळावरील दुकानांना भेटी देवून बारकाईने पाहणी केली होती. आरोपीतांची गुन्हा करण्याची पद्धत लक्षात घेता गुन्हेगार हे निफाड तालुक्यातील असण्याचा तर्क लावण्यात आला. त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व निफाड पोलिसांनी संयुक्त रित्या केलेल्या तपासात दोघा संशयीतांची नावे पुढे आली.
बाळा भास्कर गांगुर्डे उर्फ गांधी (उगाव ता. निफाड ) व जयेश एकनाथ ठेंगे (निमगाव वाकडा ता.निफाड ) या दोघांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. दोघांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांच्या कब्जातून घरफोडी चोरी करुन नेलेले एच.पी.कंपनीचे दोन गॅस सिलेंडर, रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील आरोपी बाळा गांगुर्डे हा सराईत गुन्हेगर असून त्याच्यावर घरफोडी व दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
अवघ्या बारा तासात या गुन्हयांचा तपास लावण्यात आला. या तपासकामी पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाड उप विभागीय अधिकारी माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. के.के.पाटील व रंगराव सानप यांनी तपास पुर्ण केला.
त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. स्वप्निल राजपूत, सहायक फौजदार रविंद्र शिलावट, हे.कॉ. नंदू काळे, पोलिस नाईक सागर काकड, राजू सांगळे, हेमंत गिलबिले, पो.कॉ. प्रदिप बहिरम. गौरव पगारे तसेच निफाड पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार व्हि.बी.निकम , पो.नाईक प्रदीप निवळ यांच्या पथकाचे सहकार्य लाभले.