जळगाव : धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने चोरीच्या दागीन्यांच्या छडा अवघ्या चोवीस तासात लावण्याचे कसब दाखवले आहे. एकुण 88 ग्रॅम वजनाचे 4 लाख 61 हजार 302 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. या सोने चोरी प्रकरणी दुध विक्रेत्यासह ते विकत घेणा-या दुकानदारास अटक करण्यात आली आहे.
धरणगाव येथील विजय धनलाल महाजन (रा.रामलीला चौक, धरणगांव) यांचे घरातुन 14 जानेवारी रोजी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि.जयपाल हिरे यांनी तपास आपल्याकडे घेत यात बारकाईने लक्ष घातले.
विजय महाजन यांची पत्नी सुरेखा या दररोज सकाळी सात वाजता मंदीरात देव दर्शनाला जातात. नित्यनेमानुसार त्या 14 जानेवारी रोजी देव दर्शनाला मंदीरात गेल्या होत्या. त्यावेळी नित्यनेमाप्रमाणे दुध विक्रेता त्यांच्याकडे दुध देण्यासाठी आला होता. तो कधी कधी थेट घरात देखील दुध ठेवण्यासाठी येत असे. त्या दुध विक्रेत्याने दुध वाटपासाठी आता बुलेट विकत घेतली असल्याची माहीती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्याच्या वागणूकीत देखील बदल झाला असल्याचे आढळून आले होते. चौकशी व तपासाअंती नेमकी हिच बाब पो.नि. जयपाल हिरे यांना खटकली.
त्यांनी धरणगाव येथील मोठा माळी वाड्यातील दुध विक्रेत्यास चौकशीकामी बोलावले. त्याने पो.नि.जयपाल हिरे यांचा पोलिसी खाक्या बघून आपला गुन्हा कबुल केला. त्याने चौकशीत ते दागीने कजगाव येथील दुकानदारास विकले असल्याचे कबुल केले. त्यानुसार अटकेची कारवाई पुर्ण करण्यात आली. या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. जयपाल हिरे यांनी पो.ना. प्रदिप पवार, पो.ना. मिलींद सोनार, पो.कॉ. विनोद संदानशिव, पो.कॉ. विजय धनगर, पो. कॉ. अंकुश बाविस्कर यांच्या पथकाने कारवाई पुर्ण केली.