जळगाव : नौकरी डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक करणा-या परप्रांतीय भामटा सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे. बेरोजगारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणा-या भामट्यास वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथून पोलिस उप निरिक्षक अंगद नेमाने व त्यांच्या सहका-यांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील बेरोजगार युवक सचिन संजय मराठे हा नोकरीच्या शोधात होता. नौकरी डॉट कॉम या वेबसाईटवर त्याने नोकरी मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 22 ऑगस्ट 2018 ते 22 ऑक्टोबर 2018 या कालावधीत त्यास विविध मोबाईल क्रमांकावरुन कॉल आले. कॉल करणा-यांनी त्यांची नावे रविसिंग, करन भातपुर, संग्राम भालेराव, करन लुत्रा, अनुभुती तनेजा, अनिल सिंग व श्रेया अशी सांगीतली होती. सचिन मराठे यास एचडीएफसी बॅंकेत नोकरी मिळवून देण्याचे आमीष वेळोवेळी दाखवण्यात आले होते. त्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन, ऑनलाईन मुलाखत, लॅपटॉप किट, प्रोसेसिंग फी अशा विविध कारणांसाठी सचिन मराठे याच्याकडून पंजाब नॅशनल बॅक व सिंध बॅकेत 93 हजार जमा करण्यास सांगण्यात आले. नोकरी मिळण्याच्या आशेने सचिन मराठे याने ती रक्कम बॅंक खात्यात जमा केली. रक्कम खात्यात जमा केल्यानंतर सचिन मराठे यास एचडीएफसी बॅंकेचे बनावट नियुक्ती पत्र पाठवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन मराठे याने सायबर पोलिस स्टेशनला धाव घेत रितसर तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनुसार सायबर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 1/19 भा.द.वि. 420, 468, 471 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनिमय 66 (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बळीराम हिरे व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक अंगद नेमाने यांनी या तपासाला गती दिली. तपासादरम्यान फिर्यादी सचिन मराठे यास आलेले ई मेल, मोबाईल क्रमांक, बॅंक खाते यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. या तपासात विक्रम यादव उर्फ अनिल कुमार, (रा. उत्तम नगर दिल्ली) व राहुल मदनलाल चौरसिया, (रा-वार्ड क्रं.9 आझाद नगर, चंदौली, जि.चंदौली, उत्तर प्रदेश, ह.मु.हाऊस नं. 26 दुसरा मजला मोहन गार्डनची मागील बाजू, नवादा, उत्तम नगर, दिल्ली) यांची नावे निष्पन्न झाली.
तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक अंगद नेमाणे व त्यांचे सहकारी सहायक फौजदार बाळकृष्ण पाटील, पो.हे.कॉ. प्रविण वाघ, पोलिस नाईक दिलीप चिंचोले, पो. कॉ. श्रीकांत चव्हाण, पो. कॉ. दिपक सोनवणे व पो. कॉ. गौरव पाटील आदींचे पथक दिल्ली येथे गेले. आरोपींच्या शोधार्थ हे पथक दिल्ली येथे दोन दिवस मुक्कामी राहिले. तपासकामी पो.हे.कॉ. नरेंद्र वारुळे यांची तांत्रीक मदत वेळोवेळी सुरुच होती.
दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या तपास पथकाला अखेर यश आले. अनिल कुमार पिता सुरेश कुमार उर्फ विक्रम यादव यास दिल्ली येथील रणहोला परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. त्याला 23 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. अटकेतील अनिलकुमार यादव हा दिल्ली येथे फेक कॉल सेंटर चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून एक मोबाईल तसेच विक्रम यादव याच्या नावे असलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे एचडीएफसी, आरबीएल व इंडसइंड अशा बॅंकामधे उघडण्यात आलेल्या खात्यांचे एटीएम कार्ड व आधारकार्ड मिळून आले.
फसवणूक झालेला बेरोजगार फिर्यादी सचिन मराठे याने अनिलकुमार उर्फ विक्रम यादव याच्या पंजाब अॅंण्ड सिंध बॅंक खात्यात 93 हजार रुपये जमा केले होते. तपासादरम्यान ते खाते तात्काळ फ्रिज करण्यात आले. त्यामुळे 93 हजाराची रक्कम बॅंकेत सुरक्षीत करण्यात आली. त्यामुळे ती रक्कम हस्तगत करण्यात आली. अटकेतील आरोपी अनिलकुमार यादव यास न्यायलयात हजर केले असता त्यास 28 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.