जळगाव : धरणगाव येथील चिंतामणी मोरया भागातील बंद घराची रेकी करुन चोरट्यांनी डाव साधल्याची घटना सोमवारी सकाळी (25 जानेवारी) उघडकीस आली. या प्रकरणी 26 जानेवारीच्या मध्यरात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
या घटनेत 28 तोळे सोन्यासह अर्धा किलो चांदीच्या दागीन्यांचा ऐवज व एक लाखाची रोकड असा तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पसार केला आहे. काही दिवसांपुर्वी पो.नि.जयपाल हिरे यांनी एका दुध विक्रेत्यास सोने चोरी प्रकरणी अटक केली होती. या चोरीच्या घटनेनंतर ही तिसरी चोरी असल्याचे म्हटले जात आहे. परिसरात नागरिकांनी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन पो.नि. जयपाल हिरे यांनी नागरिकांना वेळोवेळी केले आहे.
दिलीपकुमार संचेती यांनी या चोरीच्या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राजस्थानात देव दर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी डाव साधला आहे. सोमवारी सकाळी दिलीपकुमार संचेती यांच्या वडीलांच्या लक्षात हा प्रकार आला. दिलीपकुमार संचेती यांना राजस्थानातून येण्यास उशीर झाल्यामुळे गुन्हा दाखल होण्यास देखील उशीर झाला.