पुणे: पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी समीर थोरात याच्यासह एकुण आठ जणांवरील खंडणी प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील कर्मचारी समीर थोरात याच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी होती.
यावेळी डॉक्टरांना खंडणी मागून त्यांच्याकडून ७ लाख रुपये उकळणाऱ्या टोळीतील आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने समीर थोरात याचा जामीन फेटाळून लावला.
हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती. डॉक्टरांकडून ७ लाख रुपयांची खंडणी घेण्यात आली होती. खंडणी विरोधी पथकाचे पो.नि. राजेंद्र मोहिते यांनी आतापर्यंत एकुण चार जणांना अटक केली आहे.
त्यात पोलीस कर्मचारी समीर थोरात, स्वयंघोषित पत्रकार प्रदीप फासगे, सामाजिक कार्यकर्ता कैलास अवचिते, आरती चव्हाण यांना अटक केली आहे़. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर हे सर्व बारामती येथील रहिवासी फरार आहेत.
रंजना वणवे ही या टोळीची मुख्य सुत्रधार असून तिच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. ती प्रत्येक वेळी गुन्हा करताना विविध लोकांचा वापर करते. यापूर्वी तिला बार्शी येथे अशाच प्रकारे डॉक्टरांकडून खंडणी वसुल केल्या प्रकरणी अटक झाली होती. त्यावेळी तिच्यावर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या मोक्का कारवाईला १ जुलै रोजी मंजुरी दिली आहे. समीर थोरात यांच्यावतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी जामीनाबाबतचा अर्ज दाखल केला होता.