जळगाव : तुप विक्री करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा महिलांनी नशिराबाद येथील दाम्पत्याचा 1 लाख 99 हजार 821 रुपयाचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम बारसू तेली व शकुंतला पुरुषोत्तम तेली हे दाम्पत्य नशिराबाद येथे राहतात. त्यांच्याकडे तुप विक्री करण्याचे निमित्त करत दोन महिला आल्या. तुप विक्री करुन आपण थकले असल्याचा देखावा दोघा महिलांनी या दाम्पत्याकडे करत दोन घास जेवणाचे मागितले. या दाम्पत्याने माणूसकी म्हणून त्यांना जेवू घातले. त्यानंतर दोघा तुप विक्री करणा-या महिलांनी नजरेच्या सहाय्याने संमोहीत करत या दाम्पत्याला गंडवण्यास सुरुवात केली.
संमोहन विद्येच्या वापराने या महिलांनी तेली दाम्पत्याच्या घरातील तिस हजाराची रोकड व सोन्याचे दागीने असा जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज गायब केला. संमोहन विद्येला भुललेले हे दाम्पत्य दोघा महिलांना सोडण्यासाठी महामार्गापर्यंत आले होते. संमोहन विद्येचा प्रभाव कमी झाल्यानंतर या दाम्पत्याच्या लक्षात खरा प्रकार आला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.