जळगाव : शहरातील तुकारामवाडी येथील विद्यार्थ्यास मारहाण करणा-या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. यापैकी एक आरोपी यापुर्वीच अटकेत असून एक फरार आहे.
स्वप्नील धर्मराज ठाकुर या तरुणास मागील वाद मिटवून घेवू असे म्हणत सोबत येण्याची बळजबरी भुषण विजय माळी व पवन बाविस्कर या दोघांनी 31 डिसेंबर रोजी केली होती. स्वप्नील ठाकुर याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. त्यावेळी पवन बाविस्कर याने चॉपर दाखवून स्वप्निल ठाकुर यास जिवे ठार करण्याची धमकी दिली होती. या धमकीला घाबरुन स्वप्निल ठाकुर तेथून पळून गेला होता. पाठलाग करत त्यास भुषण माळी व पवन बाविस्कर या दोघांसह आकाश रविंद्र मराठे व पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर अशा चौघांनी स्मशानभुमीजवळ असलेल्या पांचाळ गल्लीजवळ स्वप्नील यास पकडण्यात आले होते.
आम्ही या एरीयाचे दादा असून तु आमच्या नादी लागू नको नाहीतर तुला महागात पडेल अशी धमकी स्वप्नील यास देण्यात आली होती. भुषण माळी याने स्वप्नीलच्या डोक्यात जवळच पडलेली फरशी मारुन दुखापत केली होती. इतरांनी त्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत स्वप्नीलची गळ्यातील सोन्याची चेन कुठेतरी पडून गेली होती. वैद्यकीय उपचार घेतांना स्वप्नील याने दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध भाग 5 गु.र.न.1/21 भा.द.वि.326, 323, 504, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आकाश रविंद्र मराठे यास तुकारामवाडीतून 31 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भुषण माळी व पवन बाविस्कर यांना 30 जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता अटक करण्यात आली आहे. पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर यास अजून अटक झालेली नाही.
फरार भुषण माळी व पवन बाविस्कर हे दोघे जण मध्य प्रदेशातील शहापूर येथे असल्याची गुप्त माहिती पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक मिलिंद सोनवणे, सुधीर साळवे, विजय बाविस्कर यांना रवाना करण्यात आले होते. पथकाने दोघांना शहापूर येथून अटक केली. त्यांना न्या. जे. जे. कांबळे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारतर्फे अॅड. ए. सी. गावित यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील करत आहेत. अटकेतील दोघा आरोपींकडून मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. अटकेतील दोघा आरोपींवर विविध स्वरुपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहे.