भिवंडी : खटल्याचे कामकाज सुरु असतांना फिर्यादी व आरोपीच्या वकीलांच्या युक्तीवादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना रवीवारी दुपारच्या वेळी भिवंडी येथील न्यायालयात समोर आली आहे. न्यायधिसांसमक्ष दोघे वकील एकमेकांना भिडल्यामुळे या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे वृत्तसंकलन करणा-या एका चॅनलच्या पत्रकाराला देखील वकीलाने मारहाणीसह धमकी देण्याचा प्रकार घडला. त्यामुळे या पत्रकाराने देखील याप्रकरणी शांतीनगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
अॅड. शैलेश गायकवाड व अॅड. अमोल कांबळे अशी त्या दोघा वकीलांची नावे आहेत. न्यायालयीन कामकाज सुरु असतांनाच युक्तीवादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी दोघा वकील महोदयांना शांतीनगर पोलिस स्टेशनला आणत पुढील कायदेशीर प्रक्रीया सुरु केली. अॅड. कांबळे यांनी अॅड. गायकवाड यांच्याविरुद्ध तकार दाखल केली आहे. या घटनेची माहिती घेणा-या एका पत्रकाराला अॅड. गायकवाड यांनी शिवीगाळ केली. बातमी प्रसिद्ध केल्यास बघून घेण्याची धमकी अॅड. गायकवाड यांनी त्या पत्रकाराला दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या पत्रकाराने देखील अॅड. गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.