पती पत्नीच्या वादात सासूचा नेहमीच सहभाग,ट्रॅक्टरखाली चिरडून संपवला कायमचा सहवास

मृतदेहाची पाहणी करतांना पोलिस

आरोपी सचीन कदम

बीड: पती पत्नीच्या वादात सासूची नेहमीच त्रासदायक मध्यस्ती जावयाला वेदनादायी ठरत होती. पती पत्नीच्या वादात आगीत तेल टाकून वाद कसा वाढेल?  यावर टपून बसणा-या सासूचा जावयाने कायमचा अंत केल्याची घटना मे महिन्यात बिड जिल्हयात घडली होती. संतप्त जावयाने सासूला ट्रॅक्टरखाली चिरडून तिचे शव जमीनीत पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडला होता. घटनेनंतर तब्बल तेरा दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले.  

सचिन तुकाराम कदम हा खासगी वाहनावरील चालक होता. ठाणे जिल्हयातील मानपाडा येथे तो नोकरी निमित्त रहात होता. विवाहित सचिन हा बिड जिल्हयाच्या मांडवखेल येथील मुळ रहिवासी होता. पत्नी निकीता व मुलगी असा त्याचा परिवार होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्याचा कामधंदा बंद झाला होता. त्यामुळे तो परिवारासह आपल्या मुळ गावी मांडवखेल येथे राहण्यास आला होता. बिड शहरातील अंकुश नगर भागात त्याची सासरवाडी होती.

संसार म्हटला म्हणजे पती पत्नीत वाद हे होतच असतात. वाद झाल्याशिवाय पती पत्नीचा संसार पुर्ण होत नाही असे देखील म्हटले जाते. संसारात भांड्याला भांडे लागतच असते असे देखील म्हणतात. मात्र प्रत्येक भांडणात मध्यस्ती करण्यासाठी पत्नीने आपल्या आईला बोलावणे योग्य नसते. घरातील पती पत्नीचा वाद चार भिंतीत मिटायला हवा. मात्र सचिन व निकिता यांच्या संसारात तसे होत नव्हते.

आरोपी तुकाराम कदम

कोणताही वाद झाला म्हणजे सचिनची पत्नी निकीता लागलीच तिची आई अलका हिस मोबाईलद्वार कळवत असे. त्यामुळे पती पत्नीतील प्रत्येक वादाचे अपडेट अलका जोगदंड या तिच्या सासूला मिळत होते. हा प्रकार सचिन यास आवडत नव्हता. आजकाल मोबाईल कंपन्यांनी अनलिमिटेड टॉक टाईम दिला आहे. त्यामुळे बहुतांश विवाहीता आपल्या माहेरी तासनतास बोलत असल्याचे दिसून येते.

आपल्या मुलीचे जावयासोबत वाद झाल्याचे समजताच निकिताची आई अलका जोगदंड तात्काळ पती पत्नीच्या समक्ष हजर होत असे. प्रत्येक वेळी ती मुलीला समजावण्या ऐवजी ती जावयाला शिवीगाळ व मारहाण देखील करत असे. हा प्रकार सचिन यास आवडत नव्हता.

गेल्या वर्षी नजिकच्या खंडेश्वरी यात्रेत सचिन त्याच्या पत्नी व लहान भावासह गेला होता. त्यावेळी यात्रेत त्यांना सचिनची सासू भेटली होती. भेटी दरम्यान सर्वांचे चहापान झाले. त्यानंतर सर्व जण आपापल्या घरी निघाले. वाटेत सचिनची पत्नी निकीता आईकडे जाण्याचा हट्ट करु लागली. त्यामुळे सचिन व निकिता यांच्यात परतीच्या प्रवासादरम्यान वाद निर्माण झाला.

या वादाची हकीकत लागलीच निकीताने मोबाईलद्वारे तिच्या आईला कळवली. आपल्या मुलीचे जावई सचिन सोबत वाद झाल्याचे समजताच सासू अलका त्याठिकाणी देखील काही वेळात हजर झाली. 

अलका जोगदंड हिने तिची मुलगी, संगीताला समजावण्या एवजी तिने थेट सचिन यास शिवीगाळ सुरु केली. एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने सचिनची कॉलर पकडून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने सचिन अस्वस्थ  झाला. त्याच्या मनात सासू अलका जोगदंड बद्दल रागाची भावना निर्माण झाली. हा प्रकार त्याने त्याचे वडील तुकाराम कदम यांना कळवला.

त्यानंतर  22 मे रोजी सचिन दिवसभर शेतात मशागतीचे काम करत होता. तो थकून भागून घरी आला. त्याने संगीताला जेवण मागितले. मात्र तिने त्याला जेवण देण्यास नकार दिला. तिने सचिनला जेवण देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पुन्हा दोघात वाद सुरु झाला. संतापाच्या भरात सचिनने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीमुळे संगीताच्या पोटात वेदना सुरु झाल्या. त्यामुळे त्याने रात्री तिला नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. रात्र बरीच झालेली होती. त्यामुळे तिला सकाळी दवाखान्यात घेवून जाण्याचे निश्चित केले.

उद्या सकाळी संगीताची आई पुन्हा येणार आणि वाद घालणार हे निश्चित होते. संगीताच्या आईला हा प्रकार समजला होता. त्यामुळे तिने सचिन यास फोन करत मी उद्या येते व तुला बघते अशी धमकी दिली होती. आता पुन्हा वाद होणार याची कल्पना सचिन यास आली होती.  

सचिन व त्याचे वडील तुकाराम कदम यांनी एकत्र येत अलका जोगदंड हिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. पिता पुत्राने एकत्र येत तिला मांडवखेल शिवारातील शेतात भांडण मिटवण्यासाठी बोलावण्याचे नियोजन केले.

यावेळी तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरले. ठरल्यानुसार 23 मे रोजी शेतातील नांगरणीसाठी सचिन ट्रॅक्टर घेवून सकाळीच लवकर निघून गेला होता. काही वेळाने त्याला दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास त्याचे वडील व सासू अलका जोगदंड असे दोघे जण येतांना दिसले.

जावई सचिन दिसताच सासूने हातात दगड घेवून त्याला फेकून मारण्यास सुरुवात केली. इकडे सचिन देखील संतापातच होता. त्याने भरधाव वेगाने ताब्यातील ट्रॅक्टर तिच्याजवळ आणले व तिला जोरदार धडक दिली. ट्रॅक्टरच्या धडकेत ती खाली पडली. ती खाली पडताच बाजूला पडलेला दगड सचिनने उचलला व तिच्या डोक्यात हाणला. डोक्यात दगडाचा घाव बसल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली.

ती ठार झाल्याची खात्री होताच सचिन व त्याचे वडील तुकाराम यांनी तिचा मृतदेह चटईत गुंडाळला. चटईत गुंडाळलेला तो मृतदेह त्यांनी जवळच असलेल्या गायरान जमीनीतील खोल खड्ड्यात पुरला. दगड व माती टाकून बुजलेल्या त्या खड्ड्यावर काटे पसरवण्यात आले. त्यानंतर सचिनचे वडील तुकाराम कदम घरी निघून गेले व सचिन शेतातच थांबून राहिला.

दरम्यानच्या काळात घरातून बाहेर गेलेली अलका जोगदंड गेल्या काही दिवसांपासून घरी परत आलेली नव्हती. 2 मे रोजी ती बेपत्ता झाल्याची नोंद तिच्या पतीने नेकनुर पोलिस स्टेशनला केली होती. या मिसींगचा तपास सुरु होता. या कालावधीत ती मुलीच्या सासरी गेल्याची माहिती तपासात पोलिसांना समजली.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांच्या दृष्टीने बेपत्ता अलका जोगदंड हिचा जावई सचिन व व्याही तुकाराम कदम यांची चौकशी करण्यात आली. मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना देत होते. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.

घटनेच्या तब्बल 14 दिवसानंतर पोलिसांनी जमिनीत पुरलेला अलकाचा मृतदेह बाहेर काढला. मयत अलका जोगदंड या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीडचे तहसीलदार, अतिरिक्त पोलीस अध्यक्ष कबाडे, उपाध्यक्ष सावंत, नेकनूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. केंद्रे, पो.हे.कॉ. अदटराव, शिंदे, युनुस बागवान, नागरगोजे आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.

 या प्रकरणी दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा नेकनूर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला. पती पत्नीच्या भांडणात सासूची नेहमी होणारी मध्यस्ती जावयाला आवडत नव्हती. तसेच सासू जावयाच्या अंगावर धावून जाणे, त्याला शिवीगाळ करणे  या प्रकाराने जावई सचिन कदम त्रस्त झाला होता. त्यातून त्याने सासू अलका जोगदंड हिची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या कामात त्याला त्याचे वडील तुकाराम कदम यांची साथ लाभली. या खूनाचा पुढील तपास सुरु आहे.

घटनास्थळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here