यवतमाळ : पोलिओ लसीकरणादरम्यान यवतमाळ येथील आरोग्य केंद्रात बारा बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बारा बालकांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दो बुंद जिंदगीके असा नारा देत राज्यात पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवली जाते. मात्र यवतमाळमधे पोलिओ लसीएवजी सॅनीटायझर बालकांना पाजल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरुवातीला या बालकांना मळमळ व उलट्या होवू लागल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती खरा प्रकार उघडकीस आला. या घटनेबद्दल बालकांच्या पालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची चौकशी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.