शिरपूर: 1 जुलै 2020 रोजी राजस्थानातून निघालेल्या ट्रक (एमपी-44 एचए – 0547) द्वारे अफूची बोंडे कर्नाटकात जात होती. याबाबतची गोपनीय माहीती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे स.पो.नि. अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार स.पो.नि. अभिषेक पाटील यांनी महामार्ग क्र 3 वर सेंधव्याकडून येणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करत सापळा लावला.
सायंकाळी सात वाजता या क्रमांकाच्या ट्रकला थांबवून चालकाची विचारपूस करण्यात आली. यावेळी चालकाने उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी गाडीची तपासणी करत टपावर तपासणी केली. टपावरील झाकण उघडून पाहिले असता त्यात एक छुपा कप्पा आढळून आला. त्यात काळया व पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमधे अंमली पदार्थ आढळून आले.
104 . 700 किलो वजनाचे सुमारे 10 लाख 47 हजार रुपये किंमतीची अफूची वाळलेली बोंडे व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चालक रघु दायमा याला अटक करत त्याच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.