जळगाव : घरफोडी करणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील दोघा अट्टल गुन्हेगारांकडून 10 लाख 1 हजार 60 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
शेख नाजीम शेख रशीद आणि शेख अरबाज शेख मेहमूद अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. तपासाअंती जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नंदगाव येथील 25 हजार रुपये रोख, 25 हजार सोन्याचे दागिने चोरीचा गुन्हा उघड झाला आहे.
4 डिसेंबर रोजी नंदगाव येथील रहिवासी शरद भास्कर धनगर यांच्या घरातील लॉकर तोडून हा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेण्यात आला होता. याशिवाय इतर गुन्ह्यातील मुद्देमाल देखील दोघांकडून हस्तगत करण्यात आला आहे. नाजीम हा अरबाजचा मेहुणा आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोघांना जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ.रवि नरवाडे, राजेश मेंढे,सुनिल दामोदरे, संजय हिवरकर, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, जयंत चौधरी,किरण चौधरी , परेश महाजन, सहायक फौजदार इंद्रीस पठाण, राजेंद्र पवार यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास हे.कॉ.रवी नरवाडे करत आहे. इतर घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.