शर्टाचा टेलरमार्क ठरला तपासाचा हिस्सा ! सौरभच्या खूनाचा अखेर उलगडला किस्सा !!

जळगाव : सौरभ गणेश राऊत हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. बिड जिल्ह्यातील गेवराई येथील चिंतेश्वर नगर भागातील रहिवासी असलेल्या व कापड दुकानावर रोजंदारीने काम करणा-या गणेश बाबुराव राऊत यांचा मुलगा सौरभ हा घरात सर्वांचा लाडका होता. जन्मत:च सौरभच्या हृदयाच्या झडपेला छिद्र असल्याने व घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे गणेश राऊत यांनी औरंगाबाद येथील धर्मदाय रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले होते.

वयाच्या चौथ्या वर्षी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यामुळे सौरभचा जणू काही पुनर्जन्म झाला होता. घरची परिस्थिती जेमतेम असली तरी लाडात वाढलेल्या सौरभने सातव्या इयत्तेनंतर शिक्षणाला रामराम ठोकला. शिक्षण अर्ध्यात सोडल्यानंतर काही दिवस तो रंग विक्रीच्या दुकानावर कामाला लागला. बालपणापासून लाडात वाढलेला सौरभ चिडचिड करायचा. मनात आले तेव्हा कुठेही निघून जात असे. संतापाच्या भरात आठ आठ दिवस तो घरी परत येत नव्हता. वाट दिसेल तिकडे निघून जात असे. कुणी जेवायला दिले तर तेच खावून दिवस काढत असे नाहीतर उपाशीच रहात असे.

मयत सौरभ राऊत

सौरभच्या या संतापी स्वभावाला त्याचे आईवडील वैतागले होते. मात्र चार बहिणींच्या पाठीवर एकुलता एक असल्यामुळे त्याचा संतापी स्वभाव सर्वजण सहन करत होते. गेल्या काही वर्षापासून त्याच्या संतापी स्वभावावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. जन्मत:च त्याचा कुटूंबीयांना अशा प्रकारे त्रास होता. असाच एके दिवशी रागाच्या भरात तो सुरत येथे निघून गेला होता. त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तो तेथेच अडकून पडला होता. लॉकडाऊन कालावधीत तो सुरतच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून व दिवसा दात्यांनी दिलेल्या अन्नाच्या पाकीटावर दिवस काढत होता. तो सुरत येथे असल्याचे समजल्यानंतर बाळू व परमेश्वर या दोघा चुलत भावांनी त्याला गेवराई  येथे परत आणले होते.

भटकंतीची सवय असलेला सौरभ फिरत फिरत जळगाव जिल्ह्याच्या सिमेवरील रावेर या तालुक्याच्या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी आला. चुलत भावाने वापरण्यासाठी दिलेला शर्ट त्याने घातला होता. रावेर या अनोळखी शहरात तो इकडून तिकडे भटकत होता. मिळेल ते खायचे आणि रात्री इकडून तिकडे भटकंती करायची असा नेहमीचा कार्यक्रम त्याने रावेर येथे देखील राबवला. त्याच रात्री रावेर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक हे गस्त घालत होते. गस्ती दरम्यान मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांना महेश विश्वनाथ महाजन, योगेश उर्फ भैय्या रमेश धोबी, विनोद विठ्ठल सातव आणि विकास गोपाळ महाजन असे चौघे मद्यपी तरुण शहरातील पेट्रोल पंपावर दिसले.

एवढ्या रात्री कुठे फिरत आहात व काय करत आहात असा प्रश्न करत स.पो.नि. शितलकुमार नाईक यांनी चौघा तरुणांना हटकले. चौघा तरुणांनी दिलेल्या उत्तराने स.पो.नि. शितलकुमार नाईक यांचे पुर्ण समाधान झाले नाही. चौघे तरुण दारु प्यालेले होते. त्यामुळे त्यांची मानसिक आणि शारिरीक अवस्था योग्य नसल्याचे स.पो.नि. शितलकुमार नाईक यांनी ओळखले. त्यातील काही तरुणांना स.पो.नि.शितलकुमार नाईक ओळखत होते. तरीदेखील सावधगिरीचा उपाय म्हणून स.पो.नि. शितलकुमार नाईक यांनी चौघा तरुणांचे फोटो आपल्या मोबाईलमधे काढून घेतले. त्यानंतर स.पो.नि. शितलकुमार नाईक पुढील गस्तीसाठी रवाना झाले.

या घडामोडीनंतर काही वेळाने चौघे मद्यपी तरुण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आले. त्याठिकाणी त्यांची नजर एकट्याने भटकंती करणा-या सौरभवर गेली. या चौकातील सप्तश्रृंगी पान सेंटर या टपरीजवळ सौरभ राऊत एकटाच उभा होता. बिड जिल्ह्यातील गेवराई येथील सौरभ राऊत रावेर शहरात एकदम नवखा होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील सप्तशृंगी पान सेंटर ही टपरी चौघा तरुणांपैकी एकाची होती. आपल्या टपरीजवळ हा नवखा तरुण कसा काय उभा आहे? तो पान टपरी फोडण्याच्या इराद्यात असल्याचा संशय चौघांना आला. त्यांनी दारुच्या नशेत त्याला इथे काय करतो असे म्हणत हटकले. सौरभच्या बोलण्यावर विश्वास बसत नसलेल्या चौघांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे म्हणणे पुर्ण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हते. मद्यप्राशन केलेल्या तरुणांनी त्याला मोटारसायकलवर कसेबसे बसवले. त्याची हेळसांड करत चौघांनी त्याला  शहरालगतच्या बुरहानपूर रस्त्यावरील गोवर्धनगरातील भूतबंगला म्हणून प्रसिद्ध असलेल्या घराच्या मागे आणले. याठिकाणी चौघा मद्यपींनी त्याच्या नाकातोंडावर मारहाण सुरु केली. मद्यपी तरुणांच्या बेदम मारहाणीत सौरभ गर्भगळीत होत जमीनीवर कोसळला. मद्याच्या नशेतील तरुणांच्या चेह-यावर जणू काही क्रौर्य निर्माण झाले होते. मोठ्या रुमालाने गळा आवळून त्यांनी सौरभला थेट यमसदनीच पाठवले. मद्याच्या नशेत सौरभचा गळा आवळल्यानंतर चौघांनी तेथून पलायन केले. 

दुस-या दिवशी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता या जागेचे रखवालदार भागवत घमा महाजन तेथे पोहोचले.  झाडांना पाणी देण्यासाठी ट्युबवेलकडे जात असतांना त्यांना सौरभचा मृतदेह दिसला. मयत सौरभ हा त्यांच्या दृष्टीने अनोळखी होता. त्यांनी या घटनेची माहिती शेतमालक पारस अग्रवाल यांना तातडीने दिली. शेतमालक पारस अग्रवाल यांनी अनोळखी मृतदेह शेतात निरखून पाहीला असता मयताचा गळा आवळून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांनी या अनोळखी मृतदेहाची माहिती लगेच रावेर पोलिस स्टेशनला कळवली.

प्रभारी पोलिस निरीक्षक एस.बी.पाटील यांनी तातडीने आपले सहकारी स.पो.नि. शितलकुमार नाईक, फौजदार मनोहर जाधव, पोलिस उप निरिक्षक मनोजकुमार वाघमारे आदींसह घटनास्थळी रवाना होण्याची तयारी केली. तत्पुर्वी त्यांनी प्रभारी उप विभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग  यांना घटनेची माहिती दिली. प्रभारी उप विभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग हे देखील तातडीने घटनास्थळी येण्यास रवाना झाले.  

सर्व अधिकारी व कर्मचारी एकाचवेळी घटनास्थळी दाखल झाले. मयत हा सर्वांच्या दृष्टीने नवखा होता. मयताची बारकाईने पाहणी केली असता त्याच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा पोलिसांना दिसून आल्या. मयताच्या चेह-यासह हाताच्या मनगटावर ओरखडे दिसत होते. घटनास्थळी शर्टाचे तुटलेले बटन देखील आढळून आले. मयताच्या शर्टावर रिलायन्स टेलर – पैठण रोड औरंगाबाद असा टेलरमार्क दिसून आला. मयत हा नक्कीच औरंगाबाद परिसरातील असावा असा सुसंगत तर्क लावण्यात आला. मात्र तो रावेर येथे का व कसा तसेच कुणाकडे आला असावा हा देखील एक प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला.

घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरील ठसे घेतले. सर्व  प्रकारे पाहणी व तपासणी पुर्ण करण्यात आली. प्रभारी उप विभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग यांनी प्रभारी पोलिस निरिक्षक एस.बी.पाटील यांना तपासकामी काही मार्गदर्शक सुचना दिल्या. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकामी रुग्णालयात रवाना करण्यात आला. मयताचा गळा आवळून मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिका-यांनी दिला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 34/21 नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी या तपासकामी सखोल लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांनी घटनेच्या रात्री शहरातील घडामोडींबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात चौघे तरुण त्यांना संशयास्पद अवस्थेत मोटारसायकलने फिरतांना आढळून आले. या चौघा तरुणांपैकी एकाच्या गळ्यातील रुमालावर रक्ताचे डाग त्यांना आढळून आले. घटनेच्या रात्री सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांनी चौघा तरुणांना हटकले  होते. चौघा तरुणांचा मोबाईलमधे फोटो देखील त्यांनी काढला होता. या माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेजमधील ते चौघे तरुण आणि स.पो.नि. शितलकुमार नाईक यांनी मोबाईलमधे फोटो काढलेल्या तरुणांच्या चेह-यात साम्य आढळून आले. शिवाय एका तरुणाच्या गळ्यातील रुमालाला लागलेल्या रक्ताच्या डागाचा प्रकार लक्षात घेता चौघांना चौकशीकामी ताब्यात घेण्याचे फर्मान अप्पर पोलिस अधिक्षक गवळी यांनी सोडले.

चौघे तरुण रावेर येथील रहिवासी असल्यामुळे त्यांना ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले  गेले. चौघांची वेगवेगळ्या मार्गाने स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. ताब्यातील चौघांपैकी एका तरुणाने पोलिसी खाक्या बघून लवकरच कबुली देण्यास सुरुवात केली. मयत तरुण हा आमच्यासाठी अनोळखी होता. तो पानटपरी फोडण्याचा तयारीत असल्याचा संशय आल्यामुळे मद्याच्या नशेत आम्ही त्यास मारल्याचे त्याने कबुल केले. गुन्ह्याची कबुली देणा-या साथीदाराला त्याच्या तिघा साथीदारांसमोर  हजर करण्यात आले. त्याने कबुली दिल्याचे बघून इतर तिघा साथीदारांनी देखील आपला गुन्हा कबुल केला. मद्याच्या नशेत व टपरी फोडत असल्याच्या संशयातून मारहाणीसह रुमालाने गळा आवळून खूनाचा प्रकार घडल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.  त्यांनी दिलेल्या कबुली जवाबानुसार त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याच्या तपासकामात अगोदर मयताची ओळख पटणे गरजेचे असते व त्यानंतर मारेकरी निष्पन्न केले जातात. मात्र या गुन्ह्यात अगोदर आरोपींची ओळख पटली. त्यानंतर मयताची ओळख पटवण्याकामी तपासाला गती देण्यात आली. मयत व आरोपी हे दोन्ही एकमेकांना अनोळखी होते.

मयताच्या शर्टावरील टेलरमार्क हाच एकमेव धागा त्याची ओळख पटवून देईल हे प्रभारी पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी ओळखले. टेलरमार्कवरुन मयताची ओळख पटवण्याकामी यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक व गुन्हा घडला त्यावेळी रावेर पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कारभार पाहणारे पो.नि. सुधीर पाटील यांची मोलाची मदत झाली. मयताच्या शर्टावर न्यु रिलायन्स टेलर्स पैठण रोड औरंगाबाद असा टेलरमार्क होता.

पो.नि. सुधीर पाटील  यापुर्वी औरंगाबाद ग्रामीणला कार्यरत होते. त्यामुळे त्यांना औरंगाबाद ग्रामीण परिसराची चांगल्या प्रकारे माहिती होती. त्यांनी औरंगाबाद येथील त्यांच्या ओळखीचा महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिस कर्मचारी अबु बकर शेख याचेशी मोबाईलवर संपर्क साधला. न्यु रिलायन्स टेलर पैठण रोड औरंगाबाद या टेलरचा मोबाईल क्रमांक मिळवून देण्याचे काम पो.नि. सुधीर पाटील यांनी अबु बकर शेख या पोलिस कॉन्स्टेबलकडे सोपवले. योगायोगाने व सुदैवाने न्यु रिलायन्स टेलर व पोलिस कर्मचारी अबु बकर शेख हे दोघे एकमेकांचे मित्रच निघाले. त्यामुळे टेलरचा मोबाईल क्रमांक शुन्य मिनिटात मिळाला. टेलरचा मोबाईल क्रमांक मिळताच पो.नि.सुधीर पाटील यांनी टेलरसोबत संपर्क साधला. व्हाटस अ‍ॅपच्या माध्यमातून टेलरला मयताच्या शर्टाचे फोटो पाठवण्यात आले. प्रत्येक टेलर मापे घेतांना कपड्याचा लहानसा तुकडा कापून तो पुरावा म्हणून बिलबुकातील बिलाच्या प्रतीसोबत ठेवत असतो. व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवलेल्या शर्टाचा फोटो आणि पुरावा म्हणून ठेवलेल्या कपड्याच्या तुकडा यांची जुळणी करत शर्टाच्या मुळ मालकाचा शोध घेण्याची टेलरला विनंती करण्यात आली.

टेलरने देखील पो.नि. सुधीर पाटील यांच्या विनंतीला मान देत जवळपास आठ ते दहा रजिस्टर शोधून काढले. व्हाटस अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवलेल्या शर्टाच्या रंगासह डिझाईनमधे आणि शोध घेत असलेल्या रंगासह डीझाईनमधे कमी अधिक प्रमाणात फरक पडत होता. पो.नि. सुधीर पाटील यांचे समाधान होण्यासाठी टेलरने या शोधकार्याचे त्यांना व्हिडीओ देखील पाठवले. मात्र हवा तसा शोध लागत नव्हता.

घटना उघडकीस आल्यानंतर योगायोगाने स.पो.नि. शितलकुमार नाईक यांना औरंगाबाद उच्च न्यायालयात कामानिमीत्त जाण्याचा योग आला. पो.नि.सुधीर पाटील यांनी स.पो.नि.शितलकुमार नाईक यांना मयताचा शर्ट सोबत घेवून जाण्यास सांगीतले. सोबत टेलरचा मोबाईल क्रमांक देखील दिला. उच्च न्यायालयाचे कामकाज आटोपल्यानंतर टेलरकडे जावून मयताचे नाव, गाव आदी तपशील शोधण्यास सांगीतले. टेलर अथवा त्याच्या कारागीरावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन शोध घेतल्यास तपास प्रभावी ठरेल हा त्यामागचा उद्देश होता. स.पो.नि.शितलकुमार नाईक यांनी पो.नि. सुधीर पाटील यांचा आदेश शिरसावद्य समजून मयताचा शर्ट ताब्यात घेत औरंगाबाद गाठले. उच्च न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी रिलायन्स टेलरचे दुकान गाठले. ब-याच प्रयत्नानंतर शर्ट शिवणा-या मुळ मालकाचा बिलाच्या माध्यमातून शोध लागला. त्या बिलावर शर्ट धारकाचे नाव “दाऊद” आणि मोबाईल क्रमांक नमुद करण्यात आलेला होता.  

त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावून संपर्क साधण्यात आला. आपण दाऊद बोलताय का? असा प्रश्न विचारला असता पलीकडून नाही असे उत्तर मिळाले. त्यानंतर सलग तिन ते चार वेळा आपण दाऊद बोलताय का असे विचारले असता तो राऊत सांगू लागला. शर्ट धारकाने त्याचे आडनाव टेलरला फोनवर राऊत असे सांगीतले होते. टेलरने राऊत एवजी चुकीने दाऊद असे ऐकले होते. त्यामुळे त्याने बिलावर दाऊद असे नमुद केले होते. त्यामुळे दाऊद आणि राऊत शब्दाचा हा गोंधळ उडाला होता. अखेर तो शर्ट धारक दाऊद नसून राऊत असल्याचे स्पष्ट झाले.

पलीकडून बोलणारा राऊत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यास त्याच्या व्हाटस अ‍ॅप क्रमांकावर मयताच्या शर्टाचा फोटो पाठवण्यात आला. तो शर्ट पलीकडून बोलणा-या राऊत नामक व्यक्तीने लागलीच ओळखला. पलीकडून बोलणारा हॉटेल मॅनेजर परमेश्वर राऊत होता. तो शर्ट त्याचाच होता. तो शर्ट त्याने त्याचा चुलत भाऊ सौरभ गणेश राऊत यास वापरण्यास दिला होता. अशा प्रकारे मयत हा सौरभ गणेश राऊत मुळ राहणार गेवराई जिल्हा बिड असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे अगोदर  चौघा आरोपींची ओळख पटली व त्यानंतर मयताची ओळख पटली. या घटनेत मिळालेले पुरावे आणि अटकेतील चौघे आरोपी यांच्या जवाबानुसार या गुन्ह्याची उकल झाली. मयताची ओळख पटवण्यासह आरोपींची अटक हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते.

आरोपी महेश विश्वनाथ महाजन, योगेश उर्फ भैय्या रमेश धोबी. विनोद विठ्ठल सातव व विकास गोपाळ महाजन यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली. यावेळी मयत सौरभ राऊत याचा चुलत भाऊ परमेश्वर राऊत हजर होता. आपल्या चुलत भावाच्या मारेक-यांना बघून त्याच्या संतापाची लाही लाही झाली होती. त्याने चौघांना बघून शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. “अरे मारायचेच होते तर एखादा सव्वाशेर पाहिला असता. या गरिबाच्या लेकराला एकट्यात मारुन तुम्ही काय हशील केले असा भावूक सवाल त्याने मारेक-यांना बघून केला.

अवघ्या 36 तासात झालेल्या या खूनाच्या उलगड्याची  माहिती पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी रावेर येथे पत्रकार परिषदेत दिली.  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना दहा हजार रुपयांचे आणि तपास करणाऱ्या पथकातील सर्वांना 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मयताची ओळख पटवण्याकामी पो.नि. सुधीर पाटील यांचे तर आरोपींचा शोध लागण्याकामी स.पो.नि. शितलकुमार नाईक यांचे मोलाचे सहकार्य या तपासात लाभले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here