जळगाव : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्याकामी मुख्य आरोपीस मदत करणा-या भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील दोघा जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक संशयीत वराडसीम ता. भुसावळ येथील महिला सरपंच यांचे पती आहेत.
26 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीस भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील दिपक उर्फ निखील किरण वाणी याने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासात दिपक वाणी याने पिडीत अल्पवयीन मुलीस चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गेवरा येथे नेल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार स.पो.नि. अमोल मोरे, हे.कॉ. रतीलाल पवार, महिला हे.कॉ. मंदा बैसाने यांचे पथक चंद्रपुर जिल्ह्यात तपासकामी गेले होते. तपास पथकाने पिडीतेसह दिपक वाणी या दोघांना ताब्यात घेत अटक केली होती. अधिक तपासाअंती पिडीतेला पळवून नेण्याकामी मदत करणारे प्रशांत निवृत्ती खाचणे व कल्पेश सुदाम वारके या दोघा तरुणांची नावे निष्पन्न झाली. त्यामुळे त्यांना या प्रकरनी सहाआरोपी करण्यात आले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील तपासात पिडीता ही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बाल लैंगीक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपासात स.पो.नि.अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, हे.कॉ. रतीलाल पवार यांनी सहभाग घेतला. यातील संशयीत आरोपी प्रशांत निवृत्ती खाचणेहे वराडसीम गावाच्या महिला सरपंचाचे पती आहेत. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.