सोलापूर: सासरच्या जाचाला कंटाळून पेशाने वकील असलेल्या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. घरात अवघ्या एक वर्षाच्या मुलीला नजरेसमोर ठेवत गळफास घेण्याचा हा दुर्दवी प्रकार घडला. या प्रकरणी महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 जूनच्या रात्री 10.30 ते 11.00 च्या दरम्यान हा दुर्दैवी प्रकार घडला होता.
धनंजय शिवाजी पवार (पती), शैलजा शिवाजी पवार(सासू), सविता शिवाजी पवार (नणंद), दीपाली शिवाजी पवार (नणंद) (सर्व रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) अशी संशयीतांची नावे आहेत. स्मिता धनंजय पवार (वय 31, रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आत्महत्या करणा-या महिला वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी आई सीतादेवी विठ्ठल गोवे (वय 50, रा. उजनी वसाहत पाठीमागे संभाजी नगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवेढा हे मयत स्मिता पवार यांचे माहेर आहे. 6 मे 2018 रोजी त्यांचे सोलापुरातील प्रा. धनंजय शिवाजी पवार यांच्या सोबत लग्न झाले होते. तुझ्या आई वडीलांनी लग्नात सोने व रक्कम कमी दिली या कारणावरुन स्मिता पवार यांचेशी सासरकडील मंडळी वाद घालत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.