जळगाव शहरातील रेड क्रॉस रक्तपेढीचा अलीकडील तिन ते चार वर्षातील कारभार नवे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची डोकेदुखी वाढवणारा ठरु शकतो असे बोलले जाते. जळगाव जिल्हयात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आणि सिव्हिल हॉस्पीटल तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. भास्कर खैरे या दोघांची उचलबांगडी झाली.
या दोघांचे बदली आदेश धडकण्यापुर्वीच्या आठ दहा दिवसात दोन घटना घडल्या. कोरोनाला आळा घालण्यासाठी कोविड आपत्ती नियंत्रण विषयक नियम कठोरपणे राबवणारे तत्कालीन जिल्हाधिकारी कुणालाच जुमानत नाही अशी ओरड उठली. खरे तर हा त्या जिल्हाधिका-यांचा कर्तव्य कठोरतेचा चांगुलपणा म्हणायला हवा.
तथापी लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या इंडीयन रेडक्रॉस सोसायटीद्वारा संचलीत रक्तपेढीला भोजनाचा ठेका दिला जाण्यासोबत रेड क्रॉस सोसायटीने लॉक डाऊन काळात शिक्षण – कृषी – महसुल कर्मचा-यांच्या संघटनांकडून देणग्या स्विकारल्याची बाब एक वादग्रस्त मुद्दा बनली.
त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना सन्मानपत्र दिल्याची बाब सोशल मिडीयावरुन जाहीर झाली. त्यामुळे शासकीय नियमावली कठोरपणे राबवणा-या जिल्हाधिका-यांच्या स्तुतीपाठकांनी त्यांच्या कथित समाजसेवेचा पुरेपुर लाभ कुठून उठवला असावा येथपासून ते बड्या अधिका-यांना कुणाच्या पुरस्काराच्या कुबड्या हव्यात कशाला? इथपर्यंत चर्चेचे मोहोळ उठले.श्रीमती प्रतिभा शिंदे या आदिवासी क्षेत्रातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्त्या असून प्रसिद्ध आहेत.
काही वर्षापुर्वी धुळे जिल्हयातील आणखी काही नेत्यांनी येथे त्यांच्या सामाजिक सेवेचे बोर्ड लावले होते. काही वर्षापुर्वी रेडक्रॉस रक्तपेढी संस्थेच्या कारभारातून माहिती मिळत नसल्याची तक्रार प्रशासनाकडे पडून आहे. गेल्याच आठवड्यात जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी कोविड सिव्हील रुग्णांना नाश्ता म्हणून प्रतिकार शक्तीवर्धक अंडी देण्याएवजी भोजन ठेकेदार मुरमुरे वाटप करत असल्याची तक्रार केली.
विशेष म्हणजे कोरोना नियंत्रक विषयक आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भोजन ठेका गैरकारभारावर प्रकाश पाडण्यात आला. यावर नेहमीप्रमाणे माहिती मागवून उचित कारवाई करु असे साचेबद्ध उत्तर येवू शकते.
सध्याचे नवे जिल्हाधिकारी येवून काहीच दिवस – आठवडे होत आहेत. त्यामुळे त्यांना येथील लोक, जनतेच्या गरजा, समाजसेवक, पुरस्कारांचे गाठोडे घेवून सत्तेसभोवती रुंजी घालणारे व्यापारी, निचौलिये (दलाल) , मदतनिस म्हणून येणारी भुतावळ समजून घेण्यासाठी यथोचित वेळ द्यावा लागेल. नव्या जिल्हाधिका-यांनी कोरोना नियंत्रण कामी रुग्णालयांना भेटी देण्याचा धडाका लावल्याचे दिसते.
त्यामुळे वैद्यकीय सेवेबाबत इष्ट बदल घडण्याची आशा निर्माण होवू शकते. रेडक्रॉस रक्तपेढीचा रक्तसाठा वाढवून गरजू रुग्णांना तातडीने विना भ्रष्टाचार उपलब्ध करुन देण्याचे डोंगराएवढे काम आहे. असे असतांना भोजन ठेकेदारीचा मागील निर्णय चुकीचा आणि आजची गचाळ नाश्ता सेवा बघता हा ठेका शुन्य मिनिटात रद करावा अशी मागणी होत आहे. रुग्णांना सशक्त आहार सेवा मिळण्याची जनतेला प्रतिक्षा दिसते. त्यावर सत्वर काय निर्णय होतो त्याची प्रतिक्षा करुया.
सुभाष वाघ (पत्रकार)
8805667750