मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरी देखील दोन मुंबई पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. याशिवाय पुणे येथील एका नर्सला देखील कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.
कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेले दोघे पोलिस कर्मचारी घाटकोपर पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. यापैकी एकाला काही दिवसांपुर्वी कोरोनाची लक्षण दिसून आली. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी सदर कर्मचा-याने चाचणी केली असता अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यानंतर दोघा पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले जात आहे.
पुणे येथील ससून रुग्णालयातील एका नर्सला देखील लस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. असे असले तरी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे ससून रुग्णालयाचे डीन मुरलीधर तांबे यांनी म्हटले आहे. सदर नर्सने कोरोनाचा पहिला डोस घेतला असून दुसरा डोस बाकी आहे. काही दिवसांपुर्वी अमरावती सामान्य रुग्णालयातील बारा कर्मचा-यांना कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. त्यावर जिल्हा शल्य चिकीत्सक निकम यांनी म्हटले आहे की कोरोना झाल्याचा आणि लसीचा संबंध नसून कोरोना लसीचे दोन डोस पुर्ण करणे गरजेचे आहे.