मुंबई : कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना कर्नाटक न्यायालयाकडून मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून रवी पुजारीचा ताबा मिळण्याकामी मुंबई पोलिसांचा न्यायालयीन लढा सुरु होता. सोमवारी त्याला मुंबईत आणले जाणार आहे. अँथोनी फर्नांडिस या नावाने रवी पुजारी अफ्रिका खंडात वास्तव्य करत होता. अफ्रिका खंडातील सेनेगल येथे त्याला अटक झाली होती. अटकेच्या वेळी बुर्कीना फासो या देशाचा पासपोर्ट पुजारीकडून पोलिसांनी हस्तगत केला होता. अफ्रिकेच्या सेनेगल येथील तपास यंत्रणेच्या लेखी दस्तावेजात अॅंथोनी फर्नांडीस या नावाने त्याची नोंद आहे.
मलेशिया, मोरोक्को आणि थायलंड, पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट व सेनेगल आदी देशात रवी पुजारी जागा बदलून वास्तव्य करत होता. खंडणीच्या रकमेतून “नमस्ते इंडीया” या नावाने विविध रेस्टॉरंट चालवणा-या रवी पुजारीवर भारतीय गुप्तचर यंत्रणेचे लक्ष होते. योग्य वेळ येताच रवी पुजारी यास अटक करण्यात आली. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीसह खंडणीसाठी धमकावणे, संघटीत गुन्हेगारी करण्याचे जवळपास अडीचशे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.