उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा भाजपाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार पात्र झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे तपशीलवार चौकशी सुरु आहे. या प्रकरणी रुबेल जोनू शेख अटकेत असून तो बांगलादेशी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
रा.कॉ. चे प्रवक्ते महेश तपासे यांनी रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असल्याबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. रुबेल हा बांगलादेशी असतांना त्याला भाजपाचा पदाधिकारी कसे केले अशी तपासे यांची तक्रार होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. तपासाअंती रुबेल जोनू शेख याच्या घरात पश्चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा – 24 उत्तर परगणा या ग्रामपंचायतीचा निवासी दाखला, बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा – नादिया या शाळेचे लिव्हींग सर्टीफिकेट मिळून आले.
पोलिसांच्या अधिक तपासात मलापोटा ग्रामपंचायतीने रुबेल जोनू शेख यास कोणत्याही प्रकारचा रहिवासी दाखला दिला नसल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया प. बंगाल येथील कागदपत्रे तपासली असता रुबेलकडील दाखला हा अन्य कुणाच्या तरी नावावर असल्याचे समोर आले आहे. शाळेच्या लिव्हींग दाखल्याबाबत चौकशी केली असता त्या नावाची शाळाच अस्तीत्वात नसल्याचे देखील उघड झाले आहे. या सर्व खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे रुबेल याने पॅनकार्ड काढले असल्याचे देखील उघड झाले आहे.