पुणे: पाषाण येथे एकाच रात्रीत अज्ञातांकडून चार दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न झाला. केला. यापैकी एका दुकानातून चोरट्यांनी 15 हजार रुपये चोरुन नेले. यावेळी दुकानात आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.सिसिटीव्हीत कैद झालेल्या चोरांनी पीपीई किटचा वापर केल्याचे यात दिसून आले आहे.
चोरी करतांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी चोरटे देखील आता पीपीई किटचा वापर करु लागल्याचे या घटनेतून सिद्ध झाले आहे. पीपीई किट परिधान केल्यामुळे चोरांचे चेहरे सीसीटीव्हीत दिसू शकले नाही. त्यामुळे त्यांची देहबोलीचा अंदाज घेवून त्यादृष्टीने तपास करावा लागणार आहे.
अनिल सोहनलाल अगरवाल (रा़ डिव ड्रॉप्स सोसायटी, बाणेर) यांनी या चोरी प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे पाषाण येथील आकाश संकुलात अगरवाल सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. 30 जूनच्या रात्री ते दुकान बंद करुन घरी गेले होते.
1 जुलैच्या सकाळी हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या दुकानाच्या काऊंटरच्या ड्रॉवरमधील 15 हजार रुपये चोरीला गेले. त्याचप्रमाणे दिनेश सयाराम चौधरी यांचे उत्तम सुपर मार्केट स्टोअर्स, प्रकाश ओमपुरी गोस्वामी यांचे हरिओम सुपर मार्केटमध्ये देखील चोरीचा प्रयत्न झाला. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत.