रेल्वे प्रवासादरम्यान आता प्रवासी वर्गाला विना अडथळा मनोरंजन मिळण्यासाठी फ्री वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच मुंबई लोकलसह मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय सेवा दिली जाईल. रेलटेलने हा निर्णय घेतला असून धावत्या लोकलमध्येही प्रवाशांना विना अडथळा मनोरंजनाचा लाभ घेता येईल.
प्रवासादरम्यान प्रवाशांना कंटेंट ऑन डिमांड अतंर्गत सर्फिंग, माहितीपट, चित्रपट, संगीत, गाण्यांचा अनुभव घेता येईल. तसेच हळूहळू विविध भाषांमध्ये मनोरंजनाचा पर्याय प्रवासी वर्गाला उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यात सुरुवातीला 10 ते 12 लोकल गाड्यांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल. मुंबई लोकल, प्रीमियम- मेल- एक्सप्रेसचा यात अंतर्भाव असेल. चेन्नई एक्स्प्रेसमध्ये देखील या सेवेचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे. रेलटेलकडे या प्रकल्पाची जबाबदारी राहील. बहुभाषक माहिती विनामुल्य आणि पैसे देऊन या दोन्ही प्रकारे ही सेवा उपलब्ध राहणार असल्याचे म्हटले जात आहे.