कोरोना विषाणूचा वाढता फैलाव बघता राज्यातील पोलिसांना देखील आता घरुन कामकाज करण्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पोलिस स्टेशनला पन्नास टक्के हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी तशी नियमावली जाहीर केली आहे.
या नियमावलीनुसार गट अ आणि ब श्रेणीच्या पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालयीन हजेरी एकुण पदसंख्येच्या शंभर टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. गट क आणि ड श्रेणीच्या पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयीन हजेरी एकूण पदसंख्येच्या पन्नास टक्के राहणार आहे. त्यातील पंचवीस टक्के कर्मचारी सकाळी 9 ते 4 या वेळेत कार्यालयात हजर राहतील. याबाबतचा निर्णय संबंधीत उप सहाय्यकाकडे सोपवला जाईल. गट क आणि ड श्रेणीतील राहिलेले कर्मचारी घरुन कामकाज करतील. असे असले तरी तातडीच्या सेवेसाठी त्यांना फोनवर हजर रहावे लागणार आहे. आवश्यकतेनुसार तातडीचे काम आल्यास त्यांना पोलिस स्टेशनचे उप सहाय्यक कार्यालयात बोलावू शकतात.