जळगाव : दुय्यम निबंधक कार्यालय पाचोरा येथील वरिष्ठ लिपीकास (प्रभारी सहायक) सातशे रुपयांची लाच घेतांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना आज घडली. या घटनेने महसुल विभागात खळबळ माजली आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील शेत मिळकती व घर मिळकतीच्या एकुण आठ उता-यांचा मुल्यांकन दाखला मिळण्याकामी तक्रारदाराने अर्ज सादर केला होता. याकामी शासकीय फी च्या व्यतिरीक्त लाचेच्या रुपात मोबदला म्हणून वरिष्ठ लिपीक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण याने सातशे रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीनुसार एसीबी पथकाने सापळ्याची रितसर तयारी केली होती. पंचांसमक्ष ज्ञानदेव चव्हाण याने सातशे रुपयांची लाच घेताच त्याच्यावर एसीबी पथकाने झडप घालत त्याला ताब्यात घेतले.
जळगाव एसीबीचे डीवायएसपी गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रविंद्र माळी, पो.हे.कॉ. अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, नासीर देशमुख, इश्वर धनगर आदींचा सापळ्यात सहभाग होता.