जळगाव : पारोळा पोलिस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल रविंद्र त्रंबक रावते आणि मंगरुळ येथील पोलिस पाटील प्रल्हाद पुंडलीक पाटील ही जोडी आज धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली. या दोघा जोडगोळीने लाचेची रक्कम स्विकारली नसली तरी मागणी केल्यामुळे दोघे अडचणीत आले आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदाराच्या भावाविरोधात पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यात तक्रारदारासह त्याच्या आईवडीलांना आरोपी न करण्यासह त्याच्या भावाला जामीन मिळण्याकामी योग्य ती मदत करण्याकामी या जोडगोळीने 13 फेब्रुवारी रोजी तक्रारदारास 40 हजार रुपयांची मागणी केली होती. सदर मागणी पंच व साक्षीदारांसमक्ष केल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले आहे. चाळीस हजारापैकी हो … नाही …… हो … नाही करत 15 हजार रुपयात काम करण्याचे ठरले होते.
या लाचेच्या मागणीपैकी दहा हजार रुपयांचा पहिला टप्पा अर्थात हप्ता तातडीने विनाविलंब तक्रारदारास आणून देण्याचे फर्मान दोघांकडून सोडण्यात आले होते. तक्रारदारास लाचेची रक्कम देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने थेट धुळे एसीबी कार्यालय गाठत आपली तक्रार दाखल केली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यास सुरुवात झाली व त्याची परिणीती आजच्या सापळ्यात झाली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिस पाटील प्रल्हाद पाटील यास ताब्यात घेत कारवाई सुरु होती.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी सुनिल कुराडे यांच्यासह पो.नि.मनजीतसिंग चव्हाण, पो.हे.कॉ. जोहरे, पो.ना. संदीप सरग, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, राजन कदम भुषण खलानेकर, प्रशांत चौधरी, सुधीर मोरे यांनी सापळा यशस्वी केला.