जळगाव : भवरलालजी जैन यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्य साधत जैन पाईपच्या सहाय्याने साकारलेल्या त्यांच्या भव्य दिव्य पोर्ट्रेटचे लोकार्पण जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे आज करण्यात आले. या कलाकृतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सेवादास दलीचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, उपाध्यक्ष अनिलभाऊ जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुलभाऊ जैन, जैन परिवारातील सर्व सदस्य, ज्यांच्या कल्पकतेतुन ही कलाकृती साकारली ते प्रदीप भोसले व त्यांचे कुटुंबिय तसेच वास्तुविशारद गिमी फरहाद, डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते लोकर्पन करण्यात आले. आर्किटेक्ट शिरीष बर्वे, प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे तसेच विविध वस्तूंचा वापर करून मोझेक आर्टमध्ये विविध कलाकृती साकारणारे अनेक जागतिक विक्रमाला गवणी घालणारे मुंबई येथील आर्टिस्ट चेतन राऊत यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली होती.
जैन पाईप्सचा उपयोग करून जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे 150 फूट लांब व 120 फूट रूंद असे सुमारे 18 हजार चौरस फूट मोजेक प्रकारातील पोर्ट्रेट साकारले. पोर्ट्रेटसाठी पीई पाईप 25 मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. दि.16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी 14 तास असे एकूण 98 तासात ही कलाकृती साकारली. या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास 21.9 किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते. या प्रकारात यापूर्वी 695 क्वेअर मीटरचा विक्रम होता, मात्र भवरलालजी जैन यांच्या या प्लास्टीक पाईप मधील मोजेक पोर्ट्रेट मुळे नवा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला. त्यासाठी प्रदीप भोसले आणि त्यांना सहकार्य करणारे प्रशांत भारती, प्रकाश पाटील, अनिल पाटील, पी.एम. चोरडिया, मोईन देशमुख, अजय काळे, अझर भिस्ती, रेवानंद चौधरी, समाधान खलसे, जगदीश सुरवाडे व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
विश्वविक्रमी कलाकृती सदैव प्रेरणा देणारी- अशोकभाऊ जैन
”कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या जन्मदिनी ही कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रिडांगणावर साकारली होती. ती कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीत आता ही कलाकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा खरोखरच आनंददायी आहे. आज ही कलाकृति लोकार्पण करताना मनस्वी आनंद होत आहे.’’ अशा भावना अशोकभाऊ जैन अध्यक्ष भवरलाल अॅण्ड कांताबाई फॉडेंशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स ली, यांनी व्यक्त केल्या.