नागपूर: एकाच्या प्रेयसीची ओळख दुस-यासोबत करुन दिली. ओळखीनंतर प्रेयसीने मुळ प्रियकराला सोडून ओळख झालेल्या नव्या मित्रासोबत फिरायला जाणे सुरु केले. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला दुसरीकडे कनेक्ट करुन देणा-या तरुणाचे अपहरण व हत्येचा कट रचला.
त्या कटानुसार चार गुंडांनी संबंधित तरुणाला बळजबरी आपल्या दुचाकीवर बसविले. त्याला लकडगंजमधील निर्जन ठिकाणी घेवून ते निघाले. मात्र रस्त्यावरील बीट मार्शलच्या लक्षात हा प्रकार आला व त्याने पाठलाग सुरु केला. बिट मार्शल मुळे अपहरण होणा-या तरुणाचा जिव वाचला व पुढील अनर्थ टळला. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत सेंट्रल एव्हेन्यू परिसरात गुरुवारी रात्री हे थरारनाट्य घडले.
याबाबत वृत्त असे की इरफान नावाचा आरटीओ एजंट शांतीनगरच्या आरपीएफ क्वॉर्टरमागे राहतो. याच परिसरात विजय हरिचंद्र चव्हाण हा कुख्यात गुन्हेगार राहतो. त्याच भागात राहतो. गेल्या मार्च महिन्यात इरफानने विजयच्या प्रेयसीची दुसऱ्या एका मित्रासोबत ओळख करून दिली होती.
तेव्हापासून प्रेयसीने विजयला सोडून ती नव्या मित्रासोबत फिरायला जावू लागली. इरफानमुळे आपली प्रेयसी हातची गेली हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे विजय व इरफान यांच्यातील वाद वाढू लागला. विजयने इरफानला ‘तेरा फायनल गेम करुंगा’, अशी धमकी दिली.
गुरुवारी रात्री सात वाजता इरफान आणि त्याचा मित्र इम्रान खान हे दोघे सेवासदन चौकात एका दुकानासमोर वाहनाची कागदपत्रे घेऊन आले होते. दोघे जण तेथे गप्पा करत असताना आरोपी विजय चव्हाण, शेख आरिफ ऊर्फ पहिलवान, शोबी शेख सतरंजीपुरा असे सर्व जण तेथे आले.
त्यांनी इरफानला चाकू दाखवून मारहाण सुरु केली. त्याला बळजबरी आपल्या ताब्यातील दुचाकीवर बसवले. त्याचा मोबाईल देखील हिसकावण्यात आला.
इरफान जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला. यावेळी गस्तीवर असलेल्या तहसील पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल गगन यादव आणि अजित ठाकूर या दोघांनी त्याचा आवाज ऐकला. प्रसंगावधान राखत बीट मार्शल यादव आणि ठाकूर या दोघांनी आरोपींचा पाठलाग सुरू ठेवला.
पोलीस आपल्या मागावर असल्याचे आरोपींच्या लक्षात आले होते. एका वळणावर त्यांनी गाडी हळू करताच संधी साधून इरफानने दुचाकीवरून खाली उडी घेतली. दरम्यान आरोपी पळून गेले. जिव वाचलेल्या इरफानने दिलेल्या तक्रारीनुसर गणेशपेठ पोलिसांनी आरोपी विजय चव्हाण आणि साथीदाराविरुद्ध अपहरण करून लुटमार करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. फरार आरोपींचा शोध सुरु आहे.