संजय राठोड प्रकरण आणि हिशेब चुकते करण्याचे राजकारण

महाराष्ट्रात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एका तरुणीच्या कथित खून की आत्महत्या? प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड गुंतल्याचे प्रकरण आता भाजप विरुद्ध शिवसेना आघाडी अशा संघर्षात बदलले आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार मोहीम उघडल्यावर त्यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात अँटी करप्शनने गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे हिशेब चुकते करण्याचे राजकारण खेळले जात असल्याचे अधोरेखित होऊ लागले आहे.

याच श्रीमती चित्रा वाघ विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला आघाडी प्रमुख नेत्या होत्या. त्या पक्षाच्या प्रवक्त्या असल्याच्या थाटात त्यावेळी भाजपवर तुटून पडत होत्या. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा भाजपची सत्ता येणार अशा अंदाजाने भाजपात शिरण्याची जी जत्रा भरली, त्या मेगा भरतीत श्रीमती चित्रा वाघ यादेखील भाजपा डेरेदाखल झाल्या. त्या काळात म्हणजे भाजप सत्तारूढ असताना चित्रा वाघ यांच्या पतीचे असेच भ्रष्टाचार प्रकरण चौकशीत घेण्यात आले होते.

विशेष म्हणजे रा.कॉ. पक्षप्रमुख शरदजी पवार यांनीच चित्रा वाघ यांच्या पतीच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी स्वतः अडचणी कथन करुन भाजपा प्रवेशाचा मार्ग अनुसरल्याचे सांगितले होते. म्हणजेच भाजपच्या विचारधारेशी सुतराम संबंध नसलेल्या अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे काँग्रेस आघाडीतून भाजपत उड्या मारणा-यांनी औट घटकेची मंत्रीपदे किंवा कारवाईच्या चक्रातून सुटका करुन घेण्यासारखे अनेक प्रकारचे लाभ मिळवले होते. आता भाजपत आलेल्या चित्रा वाघ एखाद्या तरुणीच्या आत्महत्येच्या किंवा हत्येच्या संशयास्पद प्रकरणात ज्या आक्रमकतेने शिवसेनेवर हल्ला चढवतात, तो आवेश बघून त्यांच्या आताच्या हेतूबद्दल शंका नसावी. शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री नसते तर त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांना फाडून खाल्ले असते. हा चित्रा वाघ यांनी केलेला धारदार हल्ला पाहता शिवसेनाप्रमुख उद्धवजींचा या प्रकरणातला पराकोटीचा संयम संशयाच्या भोवर्‍यात उभा करण्यात मात्र त्या यशस्वी झाल्याचे म्हणावे लागेल.

चित्रा वाघ यांनी पुण्यात येऊन पोलीस अधिकारी लगड यांना जाब विचारला. पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा नोंदवून घेतला नसल्याबद्दल त्यांनी पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. ज्यांच्या मुलीसंदर्भात जे घडले ती मंडळी त्याबाबतची तक्रार आणि गुन्हा दाखलकरण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाली नसल्याने पोलिसांची कायदेशीर अडचण दिसते. सात फेब्रुवारीच्या वरील घटनेनंतर वनमंत्री राठोड यांचे विजनवासात जाणे,एक मंत्री आठवडाभर गायब राहिल्याबद्दल शिवसेनेकडून विरोधक व जनतेला अपेक्षित कारवाई न होणे, पोहरादेवी स्थळी प्रचंड गर्दीत प्रकटलेल्या संबंधित वनमंत्री राठोड यांनी आरोप फेटाळणे, या सर्व घटनाक्रमात शिवसेनेच्या एका गटाचे राठोड यांना समर्थन असणे हा घटनाक्रम उघड झाला आहे.

भाजपचे नेते ओरडतात म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा का घ्यावा? अशाच एका प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला का? कुणी एक कन्या आत्महत्या करते म्हणून एखाद्या मंत्र्याने राजीनामा द्यावा? अशा अनेक प्रश्नांची भेंडोळी फेकण्यात आली आहेत. शिवसेना पक्षात कोणतीही गटबाजी नाही. शिवसेना प्रमुख नेत्यांचा आदेश शिरसावद्य मानूनच सर्वांची वाटतात सर्वश्रुत आहे. तथापी महाविकास आघाडीचे सरकार बनण्यापूर्वीपासूनच नेत्यांची विधाने लक्षात घेतली तर सत्तास्थापनेची तीन राजकीय पक्षांची नवी मांडणी स्वीकारतांना तीनही राजकीय पक्षांच्या मंत्र्यांच्या मनात अपेक्षित लाभ मिळाला नसल्याची सल एक अढी बनून तर राहिली नाही ना? अशी शंका येते. त्यात अनेकांना गृह खाते हवे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नावाने मुख्यमंत्रीपदाची तार छेडली गेली होतीच. मधेच काँग्रेसी मंत्र्यांच्या नाराजीचा राग आवळून झाला. याच वातावरणात तीन चाकी रिक्षा म्हणून हिणवत भाजपचे देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार विरोधात हल्ले चालूच ठेवले आहेत.

त्यात आता राठोड प्रकरणाची भर पडल्याने भाजप-शिवसेना नेतृत्वाचे घर जाळण्यासाठी आयते जळते कोलीत हाती लागले. यातच जुने हिशेब चुकते करण्याची संधी म्हणूनही काही धूर्त राजकारणी सरकार विरुद्धच्या अग्निज्वालेत स्वार्थाचे रोडगे भाजून घेऊ पहात असल्याचे जाणवते. संजय राठोड प्रकरणाची आग आणखी पेटवण्यात भाजप खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत याच प्रकरणात भा.द.वि.कलम 306 व 307 नुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. शिवसेने विरुद्ध थेट हल्ले तेज होताच शिवसेनेचे संकट मोचक आणि सरकारचे नेपथ्यरचनाकार संजय राऊत मैदानात उतरले आहेत.

संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री उद्धवजी फार का गप्प राहणार नाही. सरकारला जाब विचारणारच म्हणजे पुढचा आठवडा याच गदारोळात जाणार असे दिसते. शिवाय राठोड यांचे शक्तिप्रदर्शन नेमके कुणा विरोधात? अशा नव्या प्रश्नांची भर पडलेली आहेच. या किटाळातून राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो असा संदेश देण्यापर्यंत मंडळी असल्याचे दिसते. या मंत्र्याचा राजीनामा घेतल्यामुळे शिवसेनेचे किती नुकसान होऊ शकते? त्याचे लाभार्थी कोण होतील? वंजारा मतपेढी गमावण्याचे काय? अशा अनेक प्रकारच्या विषयांची गणिते मांडली जात आहेत. या सर्वांच्या मांडणीत जुन्या हिशेबांची किनार अधिक उजळून दिसते. मार्च अखेरीपर्यंत रण कसे माजते? याची प्रतीक्षा करायला काय हरकत आहे?

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव)
8805667750

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here