मीरारोड: साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपवधू तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी उपवर तरुणाचे आई,वडील व भावास देखील आरोपी करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की काशीमीरा पोलिस स्टेशन हद्दीतील २२ वर्षाच्या तरुणीचे गोरेगावच्या २६ वर्षीय तरुणाशी एका लग्न जुळले होते. लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून हे लग्न जुळले होते. २० फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा देखील झाला. त्यानंतर कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे दोघांचे लग्न लांबणीवर पडले. मात्र साखरपुडा झाला असल्यामुळे दोघे एकमेकांना सहज भेटू लागले.
लॉकडाऊन काळात तरुण आपल्या भावी सासरवाडीला अर्थात तरुणीच्या घरी मुक्कामी राहू लागला. दरम्यानच्या काळात दोघांमधे शरीरसंबंध निर्माण झाले. मात्र नंतर तरुणाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.
पीडित तरुणी गोरेगावला तरुणाच्या आईवडीलांना जाब विचारण्यास गेली. त्यावेळी तिला मारहाण करण्यात आल्याची तिची तक्रार आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार भावी वर असलेल्या तरुणासह त्याच्या आई, वडील व भावास आरोपी करण्यात आले आहे.