जळगाव : कायमस्वरुपी प्राध्यापक असल्याचे खोटे सांगून तरुणीची फसवणूक करणा-या पियुष हरिदास बावस्कर (औरंगाबाद) या तोतया प्राध्यापकाचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पियुष बावस्कर याचे वडील हरीदास खंडू बावस्कर, आई वासंती हरीदास बावस्कर व काका शंकर खंडू बावस्कर यांचा जामीन मात्र मंजुर झाला आहे.
पत्नीसोबत गैरकृत्य करण्याचा पियुषवर आरोप आहे. लग्नाच्या वेळी पियुष हा कायमस्वरुपी प्राध्यापक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र लग्नानंतर पियुष हा कायमस्वरुपी प्राध्यापक नसल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. पियुष याचे संस्थाचालकाशी संगनमत असल्याचे देखील समजते. त्यामुळे लग्नाच्या अगोदर मुलीकडील नातेवाईकांना पियुष हा कायमस्वरुपी प्राध्यापक असल्याचे संस्थेचे चेअरमन यांनी सांगितले होते असा देखील आरोप आहे. न्या. देशपांडे यांच्या न्यायालयात चौघांनी अर्ज दाखल केला होता. सरकारच्या वतीने ॲड. मोहन देशपांडे यांनी तर मुळ फिर्यादीच्या वतीने ॲड.कुणाल पवार यांनी न्यायालयीन प्रक्रीया पार पाडली.