औरंगाबाद: चोरट्यांनी मारहाण करुन ट्रक व ट्रकमधील गुरे हिसकावून नेल्याचा चालक व वाहकाचा बनाव पोलिसांच्या तपासात उघड झाला. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी चालक आणि वाहकाला अटक केली. त्यांच्या साथीदारांनी लिंबेजळगाव शिवारात गुरांनी भरलेला ट्र्क ताब्यात घेतला. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
ट्रकचालक अमजद अहमद कुरेशी ( बडातकिया, नुतन कॉलनी) आणि वाहक मंगेश प्रल्हाद पोळ (गवळीपुरा , छावणी) अशी अटकेतील आरोपीतांची नावे आहेत. अब्दीमंडी येथील आसाराम बाबाराव वरकड हे गुरांचा व्यवसाय करतात. त्यांनी देवगाव रंगारी येथून १६ गायी आणि गोऱ्हे खरेदी केले होते. ही जनावरे घेवून येण्याचे काम त्यांनी ट्रकमालक अब्दुल अमीन मोहम्मद खाजामिया यांना दिले होते.
यासाठी त्यांनी ट्रक भाडे ठरवले होते. अमीन यांचा ट्र्कचालक अमजद आणि क्लिनर मंगेश यांनी ३ जुलैच्या रात्री गुरे ट्र्कमध्ये भरली. त्यानंतर ते दौलताबादकडे येत असतांना वाटेत पिंपळगाव फाट्याजवळ तिघा दुचाकीस्वारांनी आपल्याला लुटल्याचा निरोप त्यांनी ट्रकमालकाला कळवला.
माहिती मिळाल्यानंतर ट्रक मालक अब्दुल अमीन यांनी सिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .स्थागुशाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे , उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत , कर्मचारी विठ्ठल राख , नवनाथ कोल्हे आदी कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. चालक आणि क्लीनरची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. केली. दोघे भिन्न माहिती कथन करु लागले. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला.
अखेर पोलिसी खाक्या बघून क्लिनर क्लीनर मंगेशने आपल्या गुन्हयाची कबुली दिली. आरोपी सचिन तायडे याने ट्रक चालक आणि क्लीनर यांना प्रत्येकी विस हजार रुपये देण्याचे कबुल केले होते. या विस हजाराच्या आमिषाला बळी पडत त्यांनी साडेचार लाख रुपयांची गुरे आणि ११ लाखाचा ट्रक चोरांच्या स्वाधिन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासाअंती गुरे आणि ट्र्क हस्तगत करण्यात आला.