कोरोना व लॉकडाऊनच्या काळात राज्यात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे महत्त्वाकांक्षी पाऊल राज्य उचलत आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शेतीच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राज्य सरकार अनेक योजना कार्यान्वीत करत आहे ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी व सामान्य माणसासाठी खूप मोलाची आहे. राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प दिलासा देणारा, स्वागतार्ह आहे. अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या चालू आर्थिक वर्षात 42 हजार कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करुन देणे तसेच शेती सिंचनासाठी सौर कृषि पंपांच्या जोडणीसाठी 1 हजार पाचशे कोटी रुपये निधीची तरतुद केली आहे. यासारख्या कृषिपुरक बाबींमुळे बळीराजाला नक्कीच बळ मिळणार आहे यात शंकाच नाही. असेही जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन म्हणाले.