जळगाव : जळगाव शहर व जिल्ह्यासह धुळे, खामगाव, पुणे हडपसर, कल्याण, कराड आदी ठिकाणी सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे करणा-या तिघा जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत अटक करण्याकामी यश मिळवले आहे. अटकेतील तिघा जणांकडून 6 लाख 25 हजार रुपये किमतीचे सोने व गुन्ह्यात वापरलेल्या तिन मोटारसायकली देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. अटकेतील तिघा जणांवर जबरी चोरीचे एकुण 30 गुन्हे दाखल असून त्यापैकी 18 गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील तिघा जणांकडून अजुन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी रा. प्रजापत नगर जळगाव, अमोल उर्फ रामेश्वर राजेंद्र अहिरे रा. विठ्ठलपेठ गोपाळपुरा जळगाव, सागर राजेंद्र चौधरी रा. जुने जळगाव अशी अटकेतील तिघा गुन्हेगारांची नावे आहेत.
गेल्या कित्येक दिवसापासून जळगाव शहर व जिल्ह्यात सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातला होता. दिवसाढवळ्या महिलांच्या अंगावरील सोने धुम स्टाईल बाइकच्या वापरातून हिसकावून पळून जाण्याचा प्रकार गुन्हेगारांकडून केला जात होता. याप्रकरणी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे व अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकारी वर्गाने तपासकामी झोकून दिले होते.
प्रत्येक दाखल गुन्ह्यातील फिर्यादी, घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ परिसरातील सिसीटीव्ही फुटेज यासह गोपनीय बातमीदारांच्या माहितीचे संकलन करुन जबरी सोनसाखळी चोरीचा छडा लावण्याचे कामकाज सुरु होते. पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार व बारकाईने केलेल्या अभ्यासानुसार या गुन्ह्यात 20 ते 25 वयोगटातील तरुण गुन्ह्यात सहभागी असल्याचे आढळून आले. हे गुन्हेगार तरुण ठरावीक वेळी व ठरावीक परिस्थीती बघून पल्सर व शाईन अशा वेगवान मोटारसायकलचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले होते. फिर्यादी व साक्षीदारांसह गुप्त बातमीदारांनी दिलेल्या वर्णनानुसार जळगाव शहरातील आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी रा. प्रजापत नगर जळगाव, अमोल उर्फ रामेश्वर राजेंद्र अहिरे रा. विठ्ठलपेठ गोपाळपुरा जळगाव, सागर राजेंद्र चौधरी रा. जुने जळगाव अशी नावे पुढे आली.या तिघा जणांवर पाळत ठेवून त्यांचेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. हे तिघे जण काहीही कामधंदा करत नसतांना एशोआरामात रहात असल्याचे दिसून आले. त्यांच्या घरची परिस्थिती सधन नसतांना देखील महागडी दारु पिणे, महागड्या दुचाकी वापरणे, महागडे कपडे परिधान करणे व मौजमजा करण्याचे प्रकार त्यांच्या बाबतीत दिसून आले.
आकाश सुर्यवंशी याचे वडील शहरात नारळ विक्रीचा आणी आई कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करते. शहरातील बिग बाजारात नोकरीला असतांना आकाश याने सात एलसीडी टीव्ही (अंदाजे किंमत 2 लाख रुपये) चोरी केले होते. त्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक झाली होती. अमोल उर्फ सागर राजेंद्र अहिरे याचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. अमोल उर्फ सागर हा मॅकेनिकल पदविकाधारक इंजीनीयर असून तो धुम स्टाईलने प्रती तास 140 कि. मी. वेगाने मोटारसायकल पळवण्यात प्रविण आहे.
यापैकी आकाश व अमोल या दोघांना शिताफीने ताब्यात घेत त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी आपले गुन्हे कबुल केले. तिघे जण एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एके दिवशी या तिघा मित्रांसमोर एक सोनसाखळी चोरीचा गुन्हा घडला होता. त्या गुन्ह्याचे तिघे मित्र प्रत्यक्षदर्शी होते. तो गुन्हा बघून त्यांच्या मनात अशा प्रकारचे गुन्हे करण्याची लालसा निर्माण झाली. असे सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्यास आपण तिघे जण मोठ्या प्रमाणात मौजमजा करु शकतो असा विचार तिघांच्या मनात चमकून गेला. तेव्हापासून तिघे मित्र या चुकीच्या उद्योगात अडकले.
प्रत्येकाने आपापले कौशल्या या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यास सुरुवात केली. सागर हा मोटारसायकल अतिशय वेगवान पद्धतीने पळवण्यात तरबेज होता. आकाश किंवा अमोल त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवर डबलसीट बसून सोनसाखळी हिसकावण्याचे काम करु लागले. गुन्हा कुठे, केव्हा व कसा करायचा हे अगोदरच ठरलेले रहात होते. एका गुन्ह्यात यशस्वी झाल्यानंतर तिघांचे धाडस वाढले. त्यानंतर ते नेहमीच सोनसाखळी चोरीचे गुन्हे करु लागले.
दरम्यान आकाश सुर्यवंशी हा काही दिवस जळगाव शहरातील एका सराफ व्यावसायीकाकडे नोकरीला होता. त्यावेळी आकाशची ओळख मोहन घाटी नावाच्या इसमाशी मैत्री झाली होती. चोरीचे सोने आकाशने मोहन घाटी याला विक्री करण्याचे काम सुरु केले होते. कालांतराने मोहन घाटी याचे निधन झाले. त्यानंतर आकाशने चोरीचे सोने दिपक शिवराम भडांगे रा. ज्ञानदेव नगर श्रावन कॉलनी याला विक्री करण्याचे काम सुरु केले. तपासादरम्यान सोने व्यावसायीक दिपक शिवराम भडांगे याचे नाव निष्पन्न झाल्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रामानंद नगर पोलिस स्टेशन, भुसावळ शहर पोलिस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन, चोपडा शहर, रावेर, अमळनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव शहर, जळगाव तालुका आदी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील 6 लाख 25 हजार रुपये किमतीचा एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तिन मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या व्यतिरिक्त अटकेतील आरोपींनी धुळे, खामगाव, पुणे, हडपसर, कल्याण, कराड तसेच पाचोरा, अमळनेर, भडगाव, पहुर, चोपडा, चाळीसगाव, व भुसावळ या ठिकाणी देखील सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुधाकर लहारे, रविंद्र गिरासे, सहायक फौजदार विजय देवराम पाटील, अशोक महाजन, पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, अनिल देशमुख, संदिप पाटील, जयंत चौधरी, गोरक्षनाथ बागुल, महेश महाजन, पोलिस नाईक सावळे, परेश महाजन, राहुल पाटील, पंकज शिंदेम योगेश वराडे, किरण चौधरी, विनायक पाटील, चालक पोलिस नाईक मुरलीधर बारी, अशोक पाटील, महिला पोलिस कर्मचारी पो.ना. सविता परदेशी, यांनी अथक परिश्रम घेत तपासकाम पुर्ण केले.